चमचमत्या चांदण्या पौर्णिम रात्री
दूध पांघरल्या सृष्टीत
मिणमिणत्या काजवदिव्यांच्या सान्निध्यात
किर्र किर्र आवाजांच्या मंत्रचळी कोलाहलात
काळ्यानिळ्या झाडीझुडपात
वेलबुट्टया अजगरासारखा सुस्त/ सु असत पडलेला तो।।१।।
थंडगार मखमली गवती लाटांच्या जादुई स्पर्शावर
आल्हाद निद्रिस्त शांत निमग्न
आगळा परि न वेगळा
वडपारंबी मुळासारखा रूतलेला तो।।२।।
लिबलिबीत मेंदूच्या लवलवत्या सर्पजिव्हांनी दंशीत
सप्तरंगी इंद्रधनुषी पाऊशी ढगांसमोर मोरपंखी पिसारा फुलवून
नाचरा गिरगिर भिरभिर गोलगोल घुम्या तो।।३।।
धुरकट फिकट लालअॉरेंजी रोगट निशतुकड्यात
भगभगीत निअॉनसाईनी गच्च काँक्रिटी बकालखान्यात
सतत प्रक्षेपित अन् टिवटिवणाऱ्या द्रृकश्राव्य चित्कारात
भयचकित तांबऱ्या डोळ्यांच्या बोकडासारखा सदा
अस्वस्थ/असा स्वस्थ तो ।।४।।
- © सिद्धार्थ कुलकर्णी
२३/५/१८