Blogadda Who are you reading today?

https://www.blogadda.com" title="Visitblogadda.com to discover Indian blogs" > https://www.blogadda.com/images/blogadda.png" width="80" height="15" border="0" alt="Visit blogadda.com to discover Indian blogs"/>

Tuesday 10 September 2019

'इन्स्टॉलेशन्स' या गणेश मतकरींच्या कथासंग्रहाची ओळख व संग्रहावरील अभिप्राय

गणेश मतकरींची ओळख बऱ्याचजणांना चित्रपट आस्वादक, समीक्षक म्हणून असेलच. याच मतकरींचा 'इन्स्टॉलेशन्स' हा कथासंग्रह आहे. पृष्ठसंख्या १६८. प्रकाशक आहेत Majestic Publishing House. या संग्रहात एकूण १० कथा आहेत. १५ ते २० पाने असा बहुतेक सर्व कथांचा विस्तार आहे. 
      या संग्रहातील पहिली कथा आहे 'इन्स्टॉलेशन्स'. ही कथा एखाद्या आर्ट फिल्मसारखी आहे. वाचकाला स्पूनफिडींग न करता स्वतः विचार करायला लावणारी. कथेतून काय गवसल, काय हरवल याबद्दल गोंधळ निर्माण करणारी तरीही इंटेलेक्चुअल किक देणारी. कथेच्या निवेदकाशी जुजबी ओळख असलेली बिल्डींगमधली (टॉवरमधील) व्यक्ती व त्या व्यक्तीला बिल्डींगमध्ये टाकाऊ म्हणून लोकांनी टाकलेल्या वस्तूंच झालेल वेगळच आकलन व त्याबाबत निवेदकाशी झालेला संवाद आणि नंतर एक अकल्पित घटना अस या कथेच स्वरूप आहे. या कथेतील वातावरण उच्चमध्यमवर्गीय आहे. नंतर येते 'शूट' ही कथा. ही कथा वर्तमान व भूतकाळ या दोन्ही काळात घडते. कथानायक कधी वर्तमानातून भूतकाळात परत तिथून वर्तमानात अलगद शिरतो. आणि हे दोन्ही काळ कथेतील आशयाला गर्द बनवण्यात साहाय्यकारी होतात. एका हॉस्पिटलमध्ये कथानायक चित्रपटाचा सीन शूट करायला येतो व त्याच हॉस्पिटलमध्ये पूर्वी त्याच्या मैत्रिणीचे वडिल admit होते हे त्याला आठवते आणि मग सुरू होतो भूत-वर्तमानाचा पाठशिवणीचा खेळ. लेखकाने मनोगतात सांगितल्याप्रमाणे लेखक कथानायकाच्या जीवनातली एक घटना त्याच्या आधी काय होत किंवा नंतर काय अशा प्रश्नांची पूर्ण उत्तरं न देता मांडतो पण तरीही पूर्णतेचा भास ही कथा देते किंवा तिच अपूर्णत्वच मोहक आहे. या कथेत थोडेफार चित्रपटाच्या शूटिंगच्या कामाचे डिटेल्स येतात जे कथानायकाच या क्षेत्रातील व्यक्तीमत्व एस्टॉब्लिश करतात.
        पुढची 'गेम' ही कथा पौगंडावस्थेत असलेल्या, आईवडिलांच्या दुराव्यामुळे व मित्राच्या आत्महत्येमुळे गोंधळलेल्या, इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलाची कहाणी आहे. भोगवादी, चंगळवादी संस्कृती, पालकांच मुलांच मन ओळखण्यात कमी पडण व मुलांच आपल्या समवयीनांमध्ये आधार शोधण्याची धडपड ही कथा चित्रित करते. या कथेत पौगंडावस्थेतील कथानायकाच्या मनाचा तळ लेखकाने घुसळला आहे. मग येणारी 'घाई' ही कथा दुसऱ्याच्या अपेक्षांप्रमाणे जगू पाहणाऱ्या व्यक्तीची धडपड व सरतेशेवटी स्वतःचा आपण आहोत तसा त्याने केलेला स्विकार हा प्रवास चित्रित केलेला आहे. पुढील 'क्रांती' ही कथा दादर पश्चिम या भागातील एका रेस्तराँच्या मालकाचा मुलगा व त्याच रेस्तराँमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या मैत्रीची  तसेच त्यांच्या वाट्यास आलेल्या विषम आर्थिक परिस्थितीची, त्यांना पडलेल्या नैतिक पेचांची आहे. टिळक ब्रिज, रानडे रोड, कबूतरखाना असे स्थळ उल्लेख या कथेला वास्तवाचा स्पर्श देतात. त्याबरोबरीने उदारीकरण, जागतिकीकरण यांच्या जमान्यात हॉटेल व्यवसायात अशिक्षित, अकुशल कामगारांची कशी फरफट होते हेसुद्धा ही कथा ओझरतं सांगून जाते. सहावी कथा आहे 'पास्ट'. या कथेत मुंबईच्या टाऊन भागात एका वास्तूच्या दर्शनाने कथानायिकेच्या मनातील आठवणींची संदूक उघडली जाते आणि एका पुस्तकासाठी  घेतलेली एका व्यक्तीची भेट व त्यामागील व पुढील घटनाक्रम उलगडतो. परंतू वर्तमानात ती ज्या कामासाठी टाऊन भागात आली असते त्याचा व पूर्वीच्या घटनांचा काही संबंध नसतो. पण आठवणी ह्या कुठल्या असंबद्ध वाटणाऱ्या गंध, ध्वनी, स्पर्श, दृश्य यांनी अंतर्मनातून उसळी मारून बाहेर येतील याचा नेम नसतो हेच आपल्याला या कथेतून दिसते.   सातव्या क्रमांकाची 'फोटो' ही कथा, कस्टमरला हव्या असणाऱ्या एका फोटोचा शोधाशोध व तदनुषंगिक घटना यामुळे फोटोस्टुडिओचा मालक असणाऱ्या फोटोग्राफरच्या रटाळ, दुर्लक्षित अस्तित्वाला काही एक सार्थकता थोडाकाळ कशी लाभते हे दर्शविते.
            आठव्या 'रिमाईन्डर' या कथेत एक घटना व त्या घटनेशी  पाच निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्ती कशापद्धतीने त्यांच्याही नकळत जोडलेल्या असतात व आयुष्य किती क्षणभंगुर असत व आपण आपल व आपल्या परिचितांच अस्तित्व किती गृहित धरतो हे मांडलेल आहे. पुढची 'वाट' ही कथा आपल्या आजारी माजी अॉफिस सहकाऱ्याला भेटायला जाणाऱ्या व त्याच्या घराची वाट सापडता सापडता दमछाक झालेल्या व त्यायोगे एका वेगळ्याच भीतीची जाणीव झालेल्या माणसाची गोष्ट आहे. 'ट्रॉमा' या शेवटच्या कथेत मुंबईत झालेले हिंदू-मुस्लिम दंगे व नंतरचे साखळी बॉम्बस्फोट यामुळे दादरच्या हिंदू कॉलनीत राहणाऱ्या  एका कॉलेज युवकाच्या मनात उठलेले तरंग यांची हकिकत समोर येते.
          या कथासंग्रहातील कथांचे निवेदन हे प्रथमपुरूषी आहे त्यामुळे माणसाच्या मनातील गुंतागुंत नीट मांडता आली आहे. कथा समकालीन आहेत. आताच्या व अगदी अलिकडच्या काळातील म्हणजे नव्वदीच्या काळातील मुंबईचे दर्शन या कथांतून होते. या शहरातील मध्यम व उच्चमध्यमवर्गीय समाजाचे चित्रण या कथांमधून बहुतकरून येते. कथासंग्रहातील भाषा आजची आहे. इंग्रजी शब्दांचा मराठीबरोबरीने निःसंकोच वापर गोष्ट सांगण्यासाठी केलेला आहे व कथांतील इंग्रजी शब्द वाचताना अडथळा न वाटता उलट लेखकाला जे काही सांगायचय ते अचूकपणे वाचकापर्यंत पोहचवतात. एखादी घटना, आठवण वा विचार व त्याला दिला जाणारा मानवी मनाच्या प्रतिसाद असे एकंदरीत या कथांचे स्वरूप आहे. कथांमध्ये सिनेमातील flashback तंत्राचा यशस्वीरीत्या वापर केला आहे.भूत व वर्तमान आलटून पालटून कथांमध्ये येत असतात.या कथा रूढ पद्धतीच्या नायक, नायिका व तदनुषंगिक घटनांची गुंफण अशा नसून काहीएक क्लोजर किंवा उत्तरं न देणाऱ्या तरीही  नवीन प्रश्न मनात निर्माण  करणाऱ्या पण वाचकास गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. अमूर्त शैलीतील चित्र व फोटो यांचे कोलाज असलेले मुखपृष्ठ कथासंग्रहातील कथांचा बाज पाहता अगदी समर्पक वाटते. एकंदरीत वास्तवदर्शी कथांचा हा संग्रह वाचायलाच हवा असा आहे.
- © सिद्धार्थ कुलकर्णी
       ११/९/१९

Monday 12 August 2019

भय ( भाग - ३ ) भय इथले संपत नाही

भीती थंड सर्पासारखी त्याला वेटोळे घालू लागली. त्याची इच्छा नसतानाही संमोहित झाल्यासारखा तो बेडवरून उठला व राखाडी चंदेरी गुढ प्रकाशात कपाटाकडे गेला. तो कपाटाजवळ पोचताच तो आवाज थांबला.आपल्याला मघापासून भास होतायत हे आठवून तो जरा सावरला. त्याने एका दमात कपाटाचा दरवाजा उघडला आणि कपाटात बसलेल्या तिला पाहून त्याचे पाय जणू जमीनीतच रूतले. हिरवं लुगड नेसलेली ती गुडघ्यात मान टाकून उकिडवी बसली होती. केसांमुळे तिचा चेहरा झाकला गेला होता. काळ जणू स्तब्ध झाला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. भोवळ आल्यासारख वाटत होत. गरगरत होत. तेवढ्यात तिने मानेला एक हिसडा दिला व खदखद हसत त्याच्याकडे पाहू लागली. पांढरी बुबुळं, मळवट भरलेलं कपाळ आणि ते भेसूर हसण. त्याच्या हातापायांतल त्राणच गेल. तरी लुळ्या पायांनी कसबस खुरडत तो बेडरूमबाहेर पडला. मागे तिच्या खदखद हसण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता. बाहेरही चंदेरी करड्या प्रकाशाने आता हातपाय पसरले होते. सर्वत्र मंतरल्यासारख धुरकट वातावरण होत. समोर स्टुल दिसताच तो त्यावर चढून माळ्यावर गेला.आता तो माळा त्याला सुरक्षित वाटत होता. थोड्या वेळाने तिचा आवाज शांत झाला. तो थरथथरत माळ्यावरच बसून राहिला. आपणही आईबाबांबरोबर गावी गेलो असतो तर बरं झाल असत अस त्याला वाटू लागल. मग परत तीच कुजबुज त्याच्या कानी पडली व त्याबरोबर धूसर रूपेरी अस्पष्ट प्रकाशात लुकलुकते डोळेही दिसले. पण त्या कुजबुजीला आता शब्द प्राप्त झाले होते. "आमचा बळी का दिलास? का दिलास आमचा बळी?" असे शब्द त्याच्या कानावर पडू लागले. तो आवाज उत्तरोत्तर वाढत गेला. त्याने असह्य होऊन कानात बोटं टाकली व डोळेही मिटून घेतले. नंतर काही काळ असाच गेला. त्याने हिंमत करून हळूच डोळे उघडले आणि त्याचा जीव त्याच्या घशात अडकला. समोरच लुकलुकत्या डोळ्यांची, विद्रूप, रक्ताळलेल्या चेहऱ्याची दोन लहान मुलं मांडी घालून त्याच्याचकडे एकटक पाहत बसली होती. त्यांनी रक्ताने माखलेली बनियन व खाकी हाफ पँट घातली होती. त्यांच्या सर्वांगावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. अचानक त्यांनी त्यांच्या माना ३६० अंशात गरगर वळवायला सुरूवात केली. ते पाहून भितीने त्याचा बर्फ झाला.मग बर्फ वितळून त्याचं पाणी व्हावं व आपली वाट शोधत जाव तस धडधडत्या हृद्याने तो सरपटत सरपटत माळ्याच्या कडेला आला व स्टुलवरून खाली उतरला. त्याने बेडरूमच्या दरवाजाकडे पाहिल तर तिथे ती उभी होती. ती खदखद हसत त्याच्याच दिशेने धावली. तो जिवाच्या आकांताने धावत हॉलकडे गेला. हॉलमध्ये ट्युबलाईटचा लख्ख प्रकाश दिसत होता व टि.व्ही.चा आवाजही ऐकू येत होता. आत शिरताच त्याने पाहिले सोफ्यावर, डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर बरेच लोक बसले होते. त्यांना मुंडकी नव्हती. केवळ धडं. मुंडकी टीपॉयवर व डायनिंग टेबलवर होती. ती मुंडकी त्याच्याकडे विस्मयाने पाहत होती. त्याला किंचाळावस वाटत होत. पण तोंडातून शब्द फुटत नव्हते.त्याच्या छातीत ठसठसत होत. हृद्यात असंख्य सुया टोचल्यासारखं वाटत होत. तेवढ्यात बेल वाजली. कोणीतरी आपल्यासारख मानवी अस्तित्व दरवाज्याबाहेर असाव व ते आपल्याला ह्या अमानवी शक्तींपासून वाचवेल, कदाचित आईबाबा आले असतील अशा आशेने तो भेलकांडत दरवाज्याकडे झेपावला. दरवाजा उघडला तर समोर मघाचचा वेडा उभा होता. त्याला त्या वेड्याचा खूप आधार वाटू लागला.तेवढ्यात त्याच्या मागे ती उभी असलेली त्याला दिसली. अन् त्याच उरलसुरल अवसानही गळाल. वेडा दरवाज्याबाहेरच उभा राहून त्याच्याकडे पाहत बेल वाजवत राहिला. त्याने मागे पाहिले तर हातात आपलीच मुंडकी घेऊन धडं उभी होती, त्याच्या पायाशी तिच दोन लहान मुलं मांडी घालून मान गरगरा फिरवत बसली होती. समोर ती उभी होती. आता त्याच हृद्य भितीने पिळवटून निघाल, त्याच्या हातापायात गोळे आले. तिचा  थंड, रूक्ष खरखरीत  हात त्याच्या गळ्यावर होता. तिची नख त्यात रूतली होती. ती हळूहळू त्याचा गळा घोटत होती.तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ होता. तिची पांढरी बुबुळं जणू त्याच्या बुबुळांना स्पर्श करत होती. वेडा अखंड बेल वाजवत होता. त्याचा श्वास आता गुदमरत होता. तिच्यापासून सुटण्याचा एक शेवटचा निकराचा निष्फळ प्रयत्न त्याने केला. पण तिने आपली पकड अधिकच घट्ट केली. त्याचा श्वास कोंडला गेला. मग छातीत सुरा खुपसल्यासारखी एक अतीव वेदना. आणि नंतर सगळ शांत झाल.
     बराच वेळ बेल वाजवूनही कोणीच दरवाजा उघडला नाही.म्हणून दरवाज्याजवळ दुधाची पिशवी ठेवून दुधवाला निघून गेला.आतून टि.व्ही.चा आवाज येत होता. तरी कोणी दरवाजा उघडत नाही याच आश्चर्य करत तो गेला. तेच पेपरवाल्यासोबत, कचरा गोळा करायला आलेल्या सोबत घडले.संध्याकाळ झाली. समोर राहणाऱ्या आजोबांनी बेल वाजवली. दिवसभर दरवाज्याबाहेर पेपर, दुधाची पिशवी पडली आहे आणि या पोराने अजून ती घरात घेतली नाही. आईबाबा गावी गेले तर थोड जबाबदारीने वागाव ना. आजकालची मुल ऐदी झाली आहेत. केवढा हा आळशीपणा असा विचार करत ते बेल वाजवत होते. पण दरवाजा काही उघडला नाही. आतून टि.व्ही.चा आवाज तर येतोय. मग त्यांनी जोरजोरात दरवाजा ठोठावला, त्याला हाक मारली. पण दरवाजा बंदच. त्याला आजोबांनी लँडलाईनवर, मोबाईलवर फोन लावून पाहिला. फोनच्या रिंगचा आवाज आतून येत होता मात्र फोन कोणीच उचलला नाही. त्यांनी मग वॉचमनला बोलवून आणले. त्याने प्रयत्न केला पण आतून काहीच प्रतिसाद नाही. आजोबांनी त्या मुलाच्या बाबांना फोन लावला तर ते म्हणाले कि ते सकाळपासून त्याला फोन लावत आहेत पण त्यांचा फोनही त्याने उचलला नाही. त्याच्या दोनतीन मित्रांना मग त्याच्या बाबांनी फोन लावले पण तो आज कोणालाच भेटलेला नाही असे कळले. नंतर त्याचे बाबा फोनवरून सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरींशी बोलले आणि चावीवाल्याला बोलवून आणायच ठरल. चावीवाला आला, नवीन चावीने latch उघडून आजोबा, वॉचमन, चावीवाला, सेक्रेटरी, चेअरमन आणि सोसायटीतली काही माणसं आत शिरली. हॉलचा लाईट, पंखा सुरू होता. टि.व्ही.ही चालू होता. ते बेडरुममध्ये गेले. तर बेडवर डोळे सताड उघडे ठेवून छताकडे पाहत तो पडला होता. त्याचा एक हात छातीवर होता. त्याचा श्वास सुरू नव्हता. हे पाहून सगळे हादरले. बिल्डींगशेजारच्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं. त्यांनी तो मृत झाल्याच घोषित केल. मग पोलिस, त्याच्या आईवडिलांना बोलावण, पोस्टमॉर्टम वगैरे. पोस्टमॉर्टममध्ये मृत्यूच कारण सांगण्यात आल, हृद्यक्रिया बंद पडून मृत्यू. एवढ्या तरूण मुलाला Heart attack कसा आला याच सर्वांनाच आश्चर्य वाटल. अस काय  घडल असाव त्याच्याबाबतीत याबद्दल लोक तर्कवितर्क लढवत राहिले. त्याच्या मृत्यूमागे मात्र होती त्याला वाटणारी आत्यंतिक भीती. भय या भावनेची ताकदच अशी जबरदस्त आहे. ही भावना मुळात सजीवांमध्ये नैसर्गिक आपत्ती, शत्रू यांपासून स्वतःचे रक्षण करता यावे म्हणून उपजतच असते. ही भावना त्यांना सावध रहायला शिकवते. याच भावनेच्या आधाराने पुढे कल्पनेने मानवाने भूतप्रेत, पिशाच्च, सैतान, हडळ, डाकिण,काळी जादू यांची निर्मिती केली. त्यांच्या कथा रचल्या. त्यावर दूरचित्रवाणी मालिका, सिनेमे काढले. स्वतःला सुरक्षित वातावणात ठेऊन कथेतल्या, सिनेमा, मालिकेतल्या भीतीदायक गोष्टी अनुभवण्याची चटक मानवी मेंदूला लागली. परंतू काही माणसं कमकुवत मनाची असतात. ह्या भूतप्रेताच्या गोष्टी त्यांच्या मनावर खोल परिणाम करतात. त्यांच्या सुप्त मनामध्ये या गोष्टी अजगरासारख्या सुस्त पडून असतात. पूरक वातावरण मिळताच त्यांच्या नकळत हा अजगर त्यांना आपल्या वेटोळ्यांमध्ये गुरफटून घेतो व गुदमरवून टाकतो. त्याच्या बाबतीत हेच घडल. भित्रा स्वभाव, त्यात रात्रीचा एकटाच घरी, भूतप्रेताची मालिका पाहिलेली, लाईट गेलेली त्यामुळे अंधार. विविध भासआभासांमुळे त्याच्या मनावर आधीच ताण होता, त्यात भर पडली ती भयानक स्वप्नाची. मग काय भयाने, भितीने आपल काम चोख बजावल व त्याचा बळी घेतला. असे अनेक भीतीचे बळी, विविध फोबियांनी ग्रासलेली माणस आपल्या आजूबाजूला असतात, पूर्वीही होती, भविष्यातही राहतील. भयाचा हा खेळ बहुतेक मानवी अस्तित्त्वाच्या अंतापर्यंत असाच सुरू राहिल. भय इथले संपत नाही हेच खरे.
समाप्त
- © सिद्धार्थ कुलकर्णी
       ८/५/१९


भय ( भाग - २ ) कोणीतरी आहे तिथे

आणि अचानक त्याला जाणवल कि ते डोळे वेगाने त्याच्याचकडे झेपावत आहेत.हे जाणवताच तो थरथरत लगेच खाली उतरला.त्याच्याच हृद्याचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते.तो कंप पावणाऱ्या शरीराला सावरत बेडरूमकडे गेला व ताण असह्य होऊन बेडवर त्याने अंग टाकून दिले.थोड्यावेळाने त्याच्या हृद्याचे ठोके पूर्ववत झाले.तो बेडच्या मागच्या भिंतीला टेकून बसला.त्याने सभोवार पाहिले.बेडरूममध्ये बाहेरचा चंद्रप्रकाश पसरला होता.त्या चंदेरी करड्या प्रकाशाचा डंख होताच निर्जीव वस्तू झडझडून उठून बसल्या आहेत अस त्याला भासलं. जणू त्यांच्यात त्या जादुई प्रकाशाने जीव ओतला होता. नक्कीच काहीतरी मायावी होत त्या प्रकाशात. मोहवणार, भुलवणार, ओढ वाटावयास लावणार. त्या प्रकाशात वस्तूंचे नेहमीचे आकार गळून पडले होते. त्यांचा मुखवटा अचानक सरकला होता आणि आतमधल विद्रूप, भयकारी अस बाहेर पडल होत. भिंतीवरच्या फोटोफ्रेममध्ये बंदिस्त झालेले त्याचे आजोबा आज नेहमीप्रमाणे मायाळू वाटत नव्हते. जणूकाही त्यांच्या चेहऱ्याचा कोणी दुसराच उग्र माणूस त्या फ्रेममध्ये आज येऊन बसला होता. त्याने डावीकडे पाहिल आणि तो टरकलाच. खुंटीला लटकवलेले कपडे शिर नसलेल्या धडासारखे दिसत होते. जणूकाही ते अधांतरी तरंगत होते. त्याची नजर वर पंख्याकडे गेली. लाईट गेल्यामुळे स्तब्ध, निश्चल असलेल्या त्या पंख्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेरं होत. तरीच तो शिकाऱ्यासारखा योग्य वेळेची वाट पाहत टपून बसला होता. घड्याळाची टिकटिक ऐकून तो भानावर आला. त्याच्या मनात भयाबरोबर आता उत्सुकतेने चंचूप्रवेश केला होता. त्या उत्सुकतेनेच त्याला ढुशा मारून उठावयास भाग पाडले. तो त्या चंदेरी करड्या धुक्यात शिरला. स्वतःलाच चाटत बसलेल्या हिंस्त्र प्राण्याप्रमाणे निवांत पहुडलेल्या कपाटाचा दरवाजा त्याने उघडला. दरवाजा उघडताना झालेला आवाज करवतीने घासल्यासारखा त्याच काळीज चिरत गेला. कपाटाने तोंड आवासलं. तो आत डोकावला. कपाटाचा ड्रॉवर त्याने बाहेर खेचला, हाताने आतील आकार चाचपडत त्याने टॉर्च बाहेर काढला. टॉर्च अॉन केला. आजूबाजूला त्याचा प्रकाशझोत टाकला. नंतर अग्नीच्या साहाय्याने जगणाऱ्या आदिम मानवाप्रमाणे तो टॉर्चच्या पिवळ्या प्रकाशाच अस्त्र पेलत मनातल्या धाकधूकीला दडपण्याचा प्रयत्न करीत बेडरूमबाहेर पडला. नंतर माळ्याच्या भिंतीला टेकवलेल्या स्टुलवर चढून त्याने मन घट्ट करून हळूवारपणे माळयामध्ये प्रकाशाचा झोत चित्रकाराच्या ब्रशपणे फिरवला व एकजिनसी वाटणाऱ्या अंधारातून वेगवेगळे आकार प्रकट झाले. तेच ते त्याच्या ओळखीचे चिरपरिचित आकार. आणि त्याला परत ती कुजबूज ऐकू आली. ती माळ्याच्या उजव्या बाजूने येत होती. बरगड्यांना धडका देणाऱ्या हृद्याच्या ठोक्यांकडे महत्प्रयासाने दुर्लक्ष करत त्याने सर्रकन टॉर्चचा झोत आवाजाच्या दिशेने वळवला. तर तिथे एक उंदिर दिगःमूढावस्थेत बसलेला त्याला दिसला. त्याला एकदम हायस वाटल. फुग्यातून हवा जावी तसा त्याच्या मनावरील ताण क्षणार्धात उडून गेला. मग "बघा मायला, अजून भूतप्रेताच्या मालिका" अस स्वतःशीच बडबडत तो स्टुलावरून खाली उतरला व सरळ बेडवर जाऊन पसरला. बराच वेळ तो उकडत असल्यामुळे या कुशीवरून त्या कुशीवर अस करत होता. परंतू कालांतराने झोपेने त्याला गिळलेच. असेच कधीतरी रात्री थंड वारे त्याला चाटू लागले. सुखानंदात चूर होऊन तो निद्रेच्या बाहुपाशात अजूनच घट्टपणे विसावला. आणि त्या आवाजाने परत त्याच्या मनाच्या भिंतीवर भीतीची पाल चुकचूकली. आधी दूरून येतोय अस वाटणाऱ्या त्या मंद धडधड आवाजाने झपाट्याने वरची पट्टी गाठली आणि मुस्काट फोडून त्याला जागं केल.तो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता. कोणीतरी कपाटाच दार आतून जोरजोरात बडवत होत.
क्रमशः
-© सिद्धार्थ कुलकर्णी
      ८/५/१९


भय ( भाग - १ ) भयाचा खेळ

Flat च लॉक उघडून तो आत आला.चपला कोपऱ्यात भिरकावून लाईट, fan सुरू करून सोफ्यावर टेकला.थोडा वेळ रुमालाने घाम पुसत स्वस्थ बसला.नंतर उठून फ्रिजचे दार उघडून त्याने पाण्याची थंड बाटली तोंडाला लावली व घटाघटा पाणी प्याला.आता दोनतीन दिवस तो घरात एकटाच असणार होता. आईवडिलांना गावाला जाणाऱ्या गाडीत बसवूनच तो आला होता. त्याने रिमोटने टि.व्ही. अॉन केला. थोडावेळ त्याने म्युझिक channel वर गाणी पाहिली.मग स्पोर्टस् channel वर कुठलेतरी जुन्या भारत अॉस्ट्रेलिया match चे highlights.अचानक त्याच लक्ष घड्याळाकडे गेलं.१० वाजत आले होते. झी वाहिनीवरच्या 'आहट' या हॉरर सिरीयलची वेळ झाली होती. केबल टि.व्ही. येऊन भारतात ४-५ वर्षे झाली होती. आईवडिवलांच्या मागे लागून काही महिन्यांपूर्वी त्याने केबल सुरू करून घेतल होत. ही 'आहट' सिरीयल भूतप्रेत यांच्या कथा दाखवणारी होती. त्याला लहानपणापासूनच गुढकथा, भूतप्रेतांच्या कहाण्या यामध्ये प्रचंड रस होता.पण त्याच्या आईवडिलांचा त्याने या गोष्टी वाचू नये, पाहू नये असा प्रयत्न असायचा.कारण तो अशा गोष्टी वाचतो, पाहतो आणि त्यांच्या परिणामवश रात्रीअपरात्री भयानक स्वप्न पडल्यामुळे जोरजोरात किंचाळतो अस ते म्हणायचे. आताही 'आहट' पाहण्यापेक्षा डिस्कव्हरी, National Geographic सारखे माहिती देणारे, ज्ञानात भर घालणारे channel पहा अस त्यांच त्याला सांगण असायच.पण आज त्याला कोणी अडवू शकणार नव्हत.सिरीयल सुरू होण्यापूर्वी लगबगीने त्याने बेडरूममध्ये जाऊन कपडे बदलले व रात्री झोपायसाठीचे म्हणून सैलसर शर्ट व थ्री फोर्थ पँट घालून परत हॉलमध्ये आला.त्याने त्याची आवडती सिरियल पाहायला सुरूवात केली.आजची कथा भन्नाटच होती.त्यात असे दाखविले होते कि नायिकेला आरशात पडणारे तिचे प्रतिबिंब भारून टाकते व तिचा घास घेते.ती सिरीयल संपल्यानंतर त्याने दुसरे काही channel पाहिले.हळूहळू त्याचे डोळे जडावू लागले आणि चालू टि.व्ही. समोरच त्याचा कधी डोळा लागला हे त्याचे त्यालाच कळले नाही.टि.व्ही.तून कानावर काही असंबद्ध आवाज पडत होते.काही काळाने ते आवाज त्याच्या कानांना स्पर्श करेनासे झाले व निद्रेच्या काळ्या डोहात तो गडप झाला.असाच बराच काळ गेला.कानाशी डासांची गुणगुण, असह्य उकाडा यामुळे रात्री कधीतरी त्याला जाग आली.क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला कळले नाही.चोहो बाजूंनी काळोख दाटून आलेला त्याला जाणवला."हं..,लाईट गेलेले दिसतायत. fan ही बंद आहे त्यामुळे.तरीच उकडतय."त्याच्या मनातील विचारांच चक्र सुरू झाल.बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता.वैतागून त्याने समोर अंदाजाने हात फिरवला, हाताशी टीपॉयवर ठेवलेले वर्तमानपत्र लागले, त्याने तो स्वतःला वारा घालू लागला. हळूहळू डोळे अंधाराला सरावू लागले.आधी त्याला त्या दृश्याची तीव्रता जाणवली नाही.पण जेव्हा ती कळली तेव्हा त्याच्या काळजात चर्र झाले.खिडकीच्या काचेआडून आपल्याकडे कोणीतरी पाहतय अस त्याला जाणवल.काचेवर ती काळी आकृती पसरली होती.मधेमधे ती डोलायची.थोडा वेळ तो बसल्या जागी चुळबुळत राहिला.शेवटी मनाचा हिय्या करून तो उठला व परत भीतीने त्याच्या पायात बेड्या घालण्याआधी झपाट्याने खिडकी बंद करण्यासाठी खिडकीकडे गेला.जणू काही खिडकी बंद केली तर त्या आकृतीला आत शिरता येणार नाही अस कुठे तरी त्याच अंतर्मन सांगत होत.खिडकीजवळ गेल्यावर मात्र स्वतःचा मूर्खपणा कळल्यामुळे तो स्वतःशीच हसला.त्याच्या मनाभोवती आवळलेला भीतीचा पाश सुटला आणि त्याला हायसं वाटल.खिडकीसमोरच्या झाडाची सावली तिच्या काचेवर पडली होती.त्याने अर्धवट उघडी असलेली खिडकी आता सताड उघडली.गार वाऱ्याची एक झुळूक त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली.उल्हसित मनाने त्याने खाली पाहिले.तर खाली कोणीतरी त्याच्याचकडे पाहत उभ होत.त्याला वाटल आपल्याला भास होतोय पण नाही तो त्याच्याचकडे एकटक पाहत होता.तो शहारला आणि लगेच खिडकी बंद करून मागे वळला.भीती परत चोरपावलांनी त्याच्या मनात शिरली होती.त्यात आज पाहिलेल्या 'आहट' च्या एपिसोडचा हँगओव्हर.तो पुढे जायचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला कोणीतरी त्याचा शर्ट मागे खेचतय असा भास झाला.भास नव्हे खरोखरच त्याचा शर्ट कोणीतरी खेचत होत.त्याच्या मानेवरून एक घामाचा थंड ओघोळ शर्टाच्या आत झिरपत गेला.धीर एकवटून तो मागे फिरला आणि त्याचा जीव भांड्यात पडला.त्याचा शर्ट खिडकीच्या stopper मध्ये अडकला होता."सालं, काय चाललय आपल?" तो स्वतःशीच पुटपुटला.मग अचानक त्याला तो आठवला एकटक त्याच्याकडे पाहणारा. एका तिरमिरीत त्याने खाडकन खिडकी उघडली व खाली पाहिल.आता त्या व्यक्तीसमोर शेकोटी पेटलेली होती व तो त्या ज्वाळांकडे स्वस्थ पाहत बसला होता."अरे, हा तर आपल्या कॉलनीतला वेडा दिसतोय?यालासुद्धा आपण घाबरू लागलो.काही खर नाही आपल.अजून पाहा 'आहट'."मान हलवत तो समाधानाने सोफ्यावर येऊन बसला.असाच काही काळ गेला आणि त्याला कोणाच्यातरी कुजबुजण्याचा अस्पष्ट आवाज आला.मनाचा भ्रम असेल म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केल.पण तो आवाज परत येऊ लागला.माळ्यावरून तो आवाज येत होता.काही एक निश्चयाने उठून धडपडत तो स्वयंपाकघरात गेला.चाचपडत त्याने फडताळावरचं मेणबत्तीच पाकिट उचलल.एक मेणबत्ती काढली.तसाच अंधारात डोळे फाडून पाहत Gasच्या शेगडीकडे येऊन त्याने लायटरने शेगडी पेटवली.शेगडीच्या प्रकाशात त्याला एकदम बरं वाटल.त्या शेगडीच्या जाळावर त्याने मेणबत्ती प्रज्वलित केली.मग एका हातात मेणबत्ती व दुसऱ्या हातात हॉलच्या दरवाज्याच्या कडेला ठेवलेला स्टुल उचलून तो माळ्याच्या भिंतीखाली ठेवला.एका हातात मेणबत्ती धरून तोल सावरत तो स्टुलावर चढला व मेणबत्तीच्या प्रकाशात माळ्यात बघू लागला.मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात माळ्यावरील अडगळीचं सामान जणू सावजाची वाट बघत दबा धरून बसलेल्या हिंस्त्र प्राण्यासारखं वाटत होत.आता कुजबुजीचा आवाज वाढला होता.तेवढ्यात त्याच्या हाताला मेणाचा चटका बसला आणि मेणबत्ती त्याच्या हातून निसटली. एकदम काळोखाने माळा गिळून टाकला. जमिनीवर मेणबत्तीचा प्रकाश शेवटचे आचके देत होता.तो भारल्यासारखा समोर पाहत होता.दोन लुकलुकणारे डोळे त्याच्याकडे अंधारातून पाहत होते.तेवढ्यात त्याच्या डावीकडे त्याच लक्ष गेल.तिथेही असेच दोन डोळे लुकलुकत होते.

क्रमशः

-© सिद्धार्थ कुलकर्णी
     ८/४/१९