आणि अचानक त्याला जाणवल कि ते डोळे वेगाने त्याच्याचकडे झेपावत आहेत.हे जाणवताच तो थरथरत लगेच खाली उतरला.त्याच्याच हृद्याचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते.तो कंप पावणाऱ्या शरीराला सावरत बेडरूमकडे गेला व ताण असह्य होऊन बेडवर त्याने अंग टाकून दिले.थोड्यावेळाने त्याच्या हृद्याचे ठोके पूर्ववत झाले.तो बेडच्या मागच्या भिंतीला टेकून बसला.त्याने सभोवार पाहिले.बेडरूममध्ये बाहेरचा चंद्रप्रकाश पसरला होता.त्या चंदेरी करड्या प्रकाशाचा डंख होताच निर्जीव वस्तू झडझडून उठून बसल्या आहेत अस त्याला भासलं. जणू त्यांच्यात त्या जादुई प्रकाशाने जीव ओतला होता. नक्कीच काहीतरी मायावी होत त्या प्रकाशात. मोहवणार, भुलवणार, ओढ वाटावयास लावणार. त्या प्रकाशात वस्तूंचे नेहमीचे आकार गळून पडले होते. त्यांचा मुखवटा अचानक सरकला होता आणि आतमधल विद्रूप, भयकारी अस बाहेर पडल होत. भिंतीवरच्या फोटोफ्रेममध्ये बंदिस्त झालेले त्याचे आजोबा आज नेहमीप्रमाणे मायाळू वाटत नव्हते. जणूकाही त्यांच्या चेहऱ्याचा कोणी दुसराच उग्र माणूस त्या फ्रेममध्ये आज येऊन बसला होता. त्याने डावीकडे पाहिल आणि तो टरकलाच. खुंटीला लटकवलेले कपडे शिर नसलेल्या धडासारखे दिसत होते. जणूकाही ते अधांतरी तरंगत होते. त्याची नजर वर पंख्याकडे गेली. लाईट गेल्यामुळे स्तब्ध, निश्चल असलेल्या त्या पंख्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेरं होत. तरीच तो शिकाऱ्यासारखा योग्य वेळेची वाट पाहत टपून बसला होता. घड्याळाची टिकटिक ऐकून तो भानावर आला. त्याच्या मनात भयाबरोबर आता उत्सुकतेने चंचूप्रवेश केला होता. त्या उत्सुकतेनेच त्याला ढुशा मारून उठावयास भाग पाडले. तो त्या चंदेरी करड्या धुक्यात शिरला. स्वतःलाच चाटत बसलेल्या हिंस्त्र प्राण्याप्रमाणे निवांत पहुडलेल्या कपाटाचा दरवाजा त्याने उघडला. दरवाजा उघडताना झालेला आवाज करवतीने घासल्यासारखा त्याच काळीज चिरत गेला. कपाटाने तोंड आवासलं. तो आत डोकावला. कपाटाचा ड्रॉवर त्याने बाहेर खेचला, हाताने आतील आकार चाचपडत त्याने टॉर्च बाहेर काढला. टॉर्च अॉन केला. आजूबाजूला त्याचा प्रकाशझोत टाकला. नंतर अग्नीच्या साहाय्याने जगणाऱ्या आदिम मानवाप्रमाणे तो टॉर्चच्या पिवळ्या प्रकाशाच अस्त्र पेलत मनातल्या धाकधूकीला दडपण्याचा प्रयत्न करीत बेडरूमबाहेर पडला. नंतर माळ्याच्या भिंतीला टेकवलेल्या स्टुलवर चढून त्याने मन घट्ट करून हळूवारपणे माळयामध्ये प्रकाशाचा झोत चित्रकाराच्या ब्रशपणे फिरवला व एकजिनसी वाटणाऱ्या अंधारातून वेगवेगळे आकार प्रकट झाले. तेच ते त्याच्या ओळखीचे चिरपरिचित आकार. आणि त्याला परत ती कुजबूज ऐकू आली. ती माळ्याच्या उजव्या बाजूने येत होती. बरगड्यांना धडका देणाऱ्या हृद्याच्या ठोक्यांकडे महत्प्रयासाने दुर्लक्ष करत त्याने सर्रकन टॉर्चचा झोत आवाजाच्या दिशेने वळवला. तर तिथे एक उंदिर दिगःमूढावस्थेत बसलेला त्याला दिसला. त्याला एकदम हायस वाटल. फुग्यातून हवा जावी तसा त्याच्या मनावरील ताण क्षणार्धात उडून गेला. मग "बघा मायला, अजून भूतप्रेताच्या मालिका" अस स्वतःशीच बडबडत तो स्टुलावरून खाली उतरला व सरळ बेडवर जाऊन पसरला. बराच वेळ तो उकडत असल्यामुळे या कुशीवरून त्या कुशीवर अस करत होता. परंतू कालांतराने झोपेने त्याला गिळलेच. असेच कधीतरी रात्री थंड वारे त्याला चाटू लागले. सुखानंदात चूर होऊन तो निद्रेच्या बाहुपाशात अजूनच घट्टपणे विसावला. आणि त्या आवाजाने परत त्याच्या मनाच्या भिंतीवर भीतीची पाल चुकचूकली. आधी दूरून येतोय अस वाटणाऱ्या त्या मंद धडधड आवाजाने झपाट्याने वरची पट्टी गाठली आणि मुस्काट फोडून त्याला जागं केल.तो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता. कोणीतरी कपाटाच दार आतून जोरजोरात बडवत होत.
क्रमशः
-© सिद्धार्थ कुलकर्णी
८/५/१९
No comments:
Post a Comment