Flat च लॉक उघडून तो आत आला.चपला कोपऱ्यात भिरकावून लाईट, fan सुरू करून सोफ्यावर टेकला.थोडा वेळ रुमालाने घाम पुसत स्वस्थ बसला.नंतर उठून फ्रिजचे दार उघडून त्याने पाण्याची थंड बाटली तोंडाला लावली व घटाघटा पाणी प्याला.आता दोनतीन दिवस तो घरात एकटाच असणार होता. आईवडिलांना गावाला जाणाऱ्या गाडीत बसवूनच तो आला होता. त्याने रिमोटने टि.व्ही. अॉन केला. थोडावेळ त्याने म्युझिक channel वर गाणी पाहिली.मग स्पोर्टस् channel वर कुठलेतरी जुन्या भारत अॉस्ट्रेलिया match चे highlights.अचानक त्याच लक्ष घड्याळाकडे गेलं.१० वाजत आले होते. झी वाहिनीवरच्या 'आहट' या हॉरर सिरीयलची वेळ झाली होती. केबल टि.व्ही. येऊन भारतात ४-५ वर्षे झाली होती. आईवडिवलांच्या मागे लागून काही महिन्यांपूर्वी त्याने केबल सुरू करून घेतल होत. ही 'आहट' सिरीयल भूतप्रेत यांच्या कथा दाखवणारी होती. त्याला लहानपणापासूनच गुढकथा, भूतप्रेतांच्या कहाण्या यामध्ये प्रचंड रस होता.पण त्याच्या आईवडिलांचा त्याने या गोष्टी वाचू नये, पाहू नये असा प्रयत्न असायचा.कारण तो अशा गोष्टी वाचतो, पाहतो आणि त्यांच्या परिणामवश रात्रीअपरात्री भयानक स्वप्न पडल्यामुळे जोरजोरात किंचाळतो अस ते म्हणायचे. आताही 'आहट' पाहण्यापेक्षा डिस्कव्हरी, National Geographic सारखे माहिती देणारे, ज्ञानात भर घालणारे channel पहा अस त्यांच त्याला सांगण असायच.पण आज त्याला कोणी अडवू शकणार नव्हत.सिरीयल सुरू होण्यापूर्वी लगबगीने त्याने बेडरूममध्ये जाऊन कपडे बदलले व रात्री झोपायसाठीचे म्हणून सैलसर शर्ट व थ्री फोर्थ पँट घालून परत हॉलमध्ये आला.त्याने त्याची आवडती सिरियल पाहायला सुरूवात केली.आजची कथा भन्नाटच होती.त्यात असे दाखविले होते कि नायिकेला आरशात पडणारे तिचे प्रतिबिंब भारून टाकते व तिचा घास घेते.ती सिरीयल संपल्यानंतर त्याने दुसरे काही channel पाहिले.हळूहळू त्याचे डोळे जडावू लागले आणि चालू टि.व्ही. समोरच त्याचा कधी डोळा लागला हे त्याचे त्यालाच कळले नाही.टि.व्ही.तून कानावर काही असंबद्ध आवाज पडत होते.काही काळाने ते आवाज त्याच्या कानांना स्पर्श करेनासे झाले व निद्रेच्या काळ्या डोहात तो गडप झाला.असाच बराच काळ गेला.कानाशी डासांची गुणगुण, असह्य उकाडा यामुळे रात्री कधीतरी त्याला जाग आली.क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला कळले नाही.चोहो बाजूंनी काळोख दाटून आलेला त्याला जाणवला."हं..,लाईट गेलेले दिसतायत. fan ही बंद आहे त्यामुळे.तरीच उकडतय."त्याच्या मनातील विचारांच चक्र सुरू झाल.बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता.वैतागून त्याने समोर अंदाजाने हात फिरवला, हाताशी टीपॉयवर ठेवलेले वर्तमानपत्र लागले, त्याने तो स्वतःला वारा घालू लागला. हळूहळू डोळे अंधाराला सरावू लागले.आधी त्याला त्या दृश्याची तीव्रता जाणवली नाही.पण जेव्हा ती कळली तेव्हा त्याच्या काळजात चर्र झाले.खिडकीच्या काचेआडून आपल्याकडे कोणीतरी पाहतय अस त्याला जाणवल.काचेवर ती काळी आकृती पसरली होती.मधेमधे ती डोलायची.थोडा वेळ तो बसल्या जागी चुळबुळत राहिला.शेवटी मनाचा हिय्या करून तो उठला व परत भीतीने त्याच्या पायात बेड्या घालण्याआधी झपाट्याने खिडकी बंद करण्यासाठी खिडकीकडे गेला.जणू काही खिडकी बंद केली तर त्या आकृतीला आत शिरता येणार नाही अस कुठे तरी त्याच अंतर्मन सांगत होत.खिडकीजवळ गेल्यावर मात्र स्वतःचा मूर्खपणा कळल्यामुळे तो स्वतःशीच हसला.त्याच्या मनाभोवती आवळलेला भीतीचा पाश सुटला आणि त्याला हायसं वाटल.खिडकीसमोरच्या झाडाची सावली तिच्या काचेवर पडली होती.त्याने अर्धवट उघडी असलेली खिडकी आता सताड उघडली.गार वाऱ्याची एक झुळूक त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली.उल्हसित मनाने त्याने खाली पाहिले.तर खाली कोणीतरी त्याच्याचकडे पाहत उभ होत.त्याला वाटल आपल्याला भास होतोय पण नाही तो त्याच्याचकडे एकटक पाहत होता.तो शहारला आणि लगेच खिडकी बंद करून मागे वळला.भीती परत चोरपावलांनी त्याच्या मनात शिरली होती.त्यात आज पाहिलेल्या 'आहट' च्या एपिसोडचा हँगओव्हर.तो पुढे जायचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला कोणीतरी त्याचा शर्ट मागे खेचतय असा भास झाला.भास नव्हे खरोखरच त्याचा शर्ट कोणीतरी खेचत होत.त्याच्या मानेवरून एक घामाचा थंड ओघोळ शर्टाच्या आत झिरपत गेला.धीर एकवटून तो मागे फिरला आणि त्याचा जीव भांड्यात पडला.त्याचा शर्ट खिडकीच्या stopper मध्ये अडकला होता."सालं, काय चाललय आपल?" तो स्वतःशीच पुटपुटला.मग अचानक त्याला तो आठवला एकटक त्याच्याकडे पाहणारा. एका तिरमिरीत त्याने खाडकन खिडकी उघडली व खाली पाहिल.आता त्या व्यक्तीसमोर शेकोटी पेटलेली होती व तो त्या ज्वाळांकडे स्वस्थ पाहत बसला होता."अरे, हा तर आपल्या कॉलनीतला वेडा दिसतोय?यालासुद्धा आपण घाबरू लागलो.काही खर नाही आपल.अजून पाहा 'आहट'."मान हलवत तो समाधानाने सोफ्यावर येऊन बसला.असाच काही काळ गेला आणि त्याला कोणाच्यातरी कुजबुजण्याचा अस्पष्ट आवाज आला.मनाचा भ्रम असेल म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केल.पण तो आवाज परत येऊ लागला.माळ्यावरून तो आवाज येत होता.काही एक निश्चयाने उठून धडपडत तो स्वयंपाकघरात गेला.चाचपडत त्याने फडताळावरचं मेणबत्तीच पाकिट उचलल.एक मेणबत्ती काढली.तसाच अंधारात डोळे फाडून पाहत Gasच्या शेगडीकडे येऊन त्याने लायटरने शेगडी पेटवली.शेगडीच्या प्रकाशात त्याला एकदम बरं वाटल.त्या शेगडीच्या जाळावर त्याने मेणबत्ती प्रज्वलित केली.मग एका हातात मेणबत्ती व दुसऱ्या हातात हॉलच्या दरवाज्याच्या कडेला ठेवलेला स्टुल उचलून तो माळ्याच्या भिंतीखाली ठेवला.एका हातात मेणबत्ती धरून तोल सावरत तो स्टुलावर चढला व मेणबत्तीच्या प्रकाशात माळ्यात बघू लागला.मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात माळ्यावरील अडगळीचं सामान जणू सावजाची वाट बघत दबा धरून बसलेल्या हिंस्त्र प्राण्यासारखं वाटत होत.आता कुजबुजीचा आवाज वाढला होता.तेवढ्यात त्याच्या हाताला मेणाचा चटका बसला आणि मेणबत्ती त्याच्या हातून निसटली. एकदम काळोखाने माळा गिळून टाकला. जमिनीवर मेणबत्तीचा प्रकाश शेवटचे आचके देत होता.तो भारल्यासारखा समोर पाहत होता.दोन लुकलुकणारे डोळे त्याच्याकडे अंधारातून पाहत होते.तेवढ्यात त्याच्या डावीकडे त्याच लक्ष गेल.तिथेही असेच दोन डोळे लुकलुकत होते.
क्रमशः
-© सिद्धार्थ कुलकर्णी
८/४/१९
No comments:
Post a Comment