Blogadda Who are you reading today?

https://www.blogadda.com" title="Visitblogadda.com to discover Indian blogs" > https://www.blogadda.com/images/blogadda.png" width="80" height="15" border="0" alt="Visit blogadda.com to discover Indian blogs"/>

Tuesday 10 September 2019

'इन्स्टॉलेशन्स' या गणेश मतकरींच्या कथासंग्रहाची ओळख व संग्रहावरील अभिप्राय

गणेश मतकरींची ओळख बऱ्याचजणांना चित्रपट आस्वादक, समीक्षक म्हणून असेलच. याच मतकरींचा 'इन्स्टॉलेशन्स' हा कथासंग्रह आहे. पृष्ठसंख्या १६८. प्रकाशक आहेत Majestic Publishing House. या संग्रहात एकूण १० कथा आहेत. १५ ते २० पाने असा बहुतेक सर्व कथांचा विस्तार आहे. 
      या संग्रहातील पहिली कथा आहे 'इन्स्टॉलेशन्स'. ही कथा एखाद्या आर्ट फिल्मसारखी आहे. वाचकाला स्पूनफिडींग न करता स्वतः विचार करायला लावणारी. कथेतून काय गवसल, काय हरवल याबद्दल गोंधळ निर्माण करणारी तरीही इंटेलेक्चुअल किक देणारी. कथेच्या निवेदकाशी जुजबी ओळख असलेली बिल्डींगमधली (टॉवरमधील) व्यक्ती व त्या व्यक्तीला बिल्डींगमध्ये टाकाऊ म्हणून लोकांनी टाकलेल्या वस्तूंच झालेल वेगळच आकलन व त्याबाबत निवेदकाशी झालेला संवाद आणि नंतर एक अकल्पित घटना अस या कथेच स्वरूप आहे. या कथेतील वातावरण उच्चमध्यमवर्गीय आहे. नंतर येते 'शूट' ही कथा. ही कथा वर्तमान व भूतकाळ या दोन्ही काळात घडते. कथानायक कधी वर्तमानातून भूतकाळात परत तिथून वर्तमानात अलगद शिरतो. आणि हे दोन्ही काळ कथेतील आशयाला गर्द बनवण्यात साहाय्यकारी होतात. एका हॉस्पिटलमध्ये कथानायक चित्रपटाचा सीन शूट करायला येतो व त्याच हॉस्पिटलमध्ये पूर्वी त्याच्या मैत्रिणीचे वडिल admit होते हे त्याला आठवते आणि मग सुरू होतो भूत-वर्तमानाचा पाठशिवणीचा खेळ. लेखकाने मनोगतात सांगितल्याप्रमाणे लेखक कथानायकाच्या जीवनातली एक घटना त्याच्या आधी काय होत किंवा नंतर काय अशा प्रश्नांची पूर्ण उत्तरं न देता मांडतो पण तरीही पूर्णतेचा भास ही कथा देते किंवा तिच अपूर्णत्वच मोहक आहे. या कथेत थोडेफार चित्रपटाच्या शूटिंगच्या कामाचे डिटेल्स येतात जे कथानायकाच या क्षेत्रातील व्यक्तीमत्व एस्टॉब्लिश करतात.
        पुढची 'गेम' ही कथा पौगंडावस्थेत असलेल्या, आईवडिलांच्या दुराव्यामुळे व मित्राच्या आत्महत्येमुळे गोंधळलेल्या, इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलाची कहाणी आहे. भोगवादी, चंगळवादी संस्कृती, पालकांच मुलांच मन ओळखण्यात कमी पडण व मुलांच आपल्या समवयीनांमध्ये आधार शोधण्याची धडपड ही कथा चित्रित करते. या कथेत पौगंडावस्थेतील कथानायकाच्या मनाचा तळ लेखकाने घुसळला आहे. मग येणारी 'घाई' ही कथा दुसऱ्याच्या अपेक्षांप्रमाणे जगू पाहणाऱ्या व्यक्तीची धडपड व सरतेशेवटी स्वतःचा आपण आहोत तसा त्याने केलेला स्विकार हा प्रवास चित्रित केलेला आहे. पुढील 'क्रांती' ही कथा दादर पश्चिम या भागातील एका रेस्तराँच्या मालकाचा मुलगा व त्याच रेस्तराँमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या मैत्रीची  तसेच त्यांच्या वाट्यास आलेल्या विषम आर्थिक परिस्थितीची, त्यांना पडलेल्या नैतिक पेचांची आहे. टिळक ब्रिज, रानडे रोड, कबूतरखाना असे स्थळ उल्लेख या कथेला वास्तवाचा स्पर्श देतात. त्याबरोबरीने उदारीकरण, जागतिकीकरण यांच्या जमान्यात हॉटेल व्यवसायात अशिक्षित, अकुशल कामगारांची कशी फरफट होते हेसुद्धा ही कथा ओझरतं सांगून जाते. सहावी कथा आहे 'पास्ट'. या कथेत मुंबईच्या टाऊन भागात एका वास्तूच्या दर्शनाने कथानायिकेच्या मनातील आठवणींची संदूक उघडली जाते आणि एका पुस्तकासाठी  घेतलेली एका व्यक्तीची भेट व त्यामागील व पुढील घटनाक्रम उलगडतो. परंतू वर्तमानात ती ज्या कामासाठी टाऊन भागात आली असते त्याचा व पूर्वीच्या घटनांचा काही संबंध नसतो. पण आठवणी ह्या कुठल्या असंबद्ध वाटणाऱ्या गंध, ध्वनी, स्पर्श, दृश्य यांनी अंतर्मनातून उसळी मारून बाहेर येतील याचा नेम नसतो हेच आपल्याला या कथेतून दिसते.   सातव्या क्रमांकाची 'फोटो' ही कथा, कस्टमरला हव्या असणाऱ्या एका फोटोचा शोधाशोध व तदनुषंगिक घटना यामुळे फोटोस्टुडिओचा मालक असणाऱ्या फोटोग्राफरच्या रटाळ, दुर्लक्षित अस्तित्वाला काही एक सार्थकता थोडाकाळ कशी लाभते हे दर्शविते.
            आठव्या 'रिमाईन्डर' या कथेत एक घटना व त्या घटनेशी  पाच निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्ती कशापद्धतीने त्यांच्याही नकळत जोडलेल्या असतात व आयुष्य किती क्षणभंगुर असत व आपण आपल व आपल्या परिचितांच अस्तित्व किती गृहित धरतो हे मांडलेल आहे. पुढची 'वाट' ही कथा आपल्या आजारी माजी अॉफिस सहकाऱ्याला भेटायला जाणाऱ्या व त्याच्या घराची वाट सापडता सापडता दमछाक झालेल्या व त्यायोगे एका वेगळ्याच भीतीची जाणीव झालेल्या माणसाची गोष्ट आहे. 'ट्रॉमा' या शेवटच्या कथेत मुंबईत झालेले हिंदू-मुस्लिम दंगे व नंतरचे साखळी बॉम्बस्फोट यामुळे दादरच्या हिंदू कॉलनीत राहणाऱ्या  एका कॉलेज युवकाच्या मनात उठलेले तरंग यांची हकिकत समोर येते.
          या कथासंग्रहातील कथांचे निवेदन हे प्रथमपुरूषी आहे त्यामुळे माणसाच्या मनातील गुंतागुंत नीट मांडता आली आहे. कथा समकालीन आहेत. आताच्या व अगदी अलिकडच्या काळातील म्हणजे नव्वदीच्या काळातील मुंबईचे दर्शन या कथांतून होते. या शहरातील मध्यम व उच्चमध्यमवर्गीय समाजाचे चित्रण या कथांमधून बहुतकरून येते. कथासंग्रहातील भाषा आजची आहे. इंग्रजी शब्दांचा मराठीबरोबरीने निःसंकोच वापर गोष्ट सांगण्यासाठी केलेला आहे व कथांतील इंग्रजी शब्द वाचताना अडथळा न वाटता उलट लेखकाला जे काही सांगायचय ते अचूकपणे वाचकापर्यंत पोहचवतात. एखादी घटना, आठवण वा विचार व त्याला दिला जाणारा मानवी मनाच्या प्रतिसाद असे एकंदरीत या कथांचे स्वरूप आहे. कथांमध्ये सिनेमातील flashback तंत्राचा यशस्वीरीत्या वापर केला आहे.भूत व वर्तमान आलटून पालटून कथांमध्ये येत असतात.या कथा रूढ पद्धतीच्या नायक, नायिका व तदनुषंगिक घटनांची गुंफण अशा नसून काहीएक क्लोजर किंवा उत्तरं न देणाऱ्या तरीही  नवीन प्रश्न मनात निर्माण  करणाऱ्या पण वाचकास गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. अमूर्त शैलीतील चित्र व फोटो यांचे कोलाज असलेले मुखपृष्ठ कथासंग्रहातील कथांचा बाज पाहता अगदी समर्पक वाटते. एकंदरीत वास्तवदर्शी कथांचा हा संग्रह वाचायलाच हवा असा आहे.
- © सिद्धार्थ कुलकर्णी
       ११/९/१९