Blogadda Who are you reading today?

https://www.blogadda.com" title="Visitblogadda.com to discover Indian blogs" > https://www.blogadda.com/images/blogadda.png" width="80" height="15" border="0" alt="Visit blogadda.com to discover Indian blogs"/>

Saturday 29 September 2018

अनास्थेचे गोंदण



अनास्थेचे गोंदण






अनास्थेचे गोंदण 

















तुम्ही जा खुशाल शौचास पांढऱ्याशुभ्र संगमरवरासारख्या
टाईल्सच्या संडासात

आम्ही हगू निवांत रेल्वेरूळांजवळ पाहत तुमची
लोकलमधली गच्च खदखद

तुम्ही दररोज व्हा सुस्नात गीझरच्या गरम पाण्याने आंघोळ करून

आम्ही महिनोमहिन्यांचे पारोसे खाजऱ्या अंगाने तुम्हाला
हात लावण्याची भीती घालून करू वसूली तुमच्याकडून

तुम्ही प्या Eno आधी पोट फुटेस्तोवर जेवून

आणि आम्ही पिऊ पाणी भूकेस हुसकावण्यासाठी पोटातून

तुमच्या गगनचुंबी टॉवरच्या कडेला फुटपाथवर टाकू आम्ही
आमच्या पथाऱ्या

तुमच्या रेल्वेस्टेशन, बसस्टँड बाहेर वाजवू आम्ही आमच्या
गरीबीच्या तुताऱ्या

तुमच्या मंदिरांबाहेर रांगेत बसू आम्ही दारिद्र्याचा शेंदूर
फासलेल्या मूर्तीसारखे घेण्यास भिकेची खिरापत

तर कधी करू तुमची करूण आर्जवे गाऊन फिल्मी
गाणी गेंगाण्या आवाजात

कधी करू प्रदर्शन स्वतःच्या अपंगत्वाचे, रोगाचे तुमच्यासमोर ओंगळवाणे

तर कधी टाळ्या कुटत भसाड्या आवाजात तुमच्याशी बोलून
करू तुम्हाला ओशाळवाणे

पण तुम्ही कितीही टाळले, दुर्लक्ष केले, अनुल्लेखाने मारले

तरी आम्ही बनून राहू भळभळती जखम तुमच्या व्यवस्थेची

ज्या व्यवस्थेने उद्ध्वस्त केले आम्हाला  प्रकल्पग्रस्त
करून,

लज्जेपोटी, दारिद्र्यापोटी अनाथ करून दिले उकिरड्यावरती  फेकून

स्वार्थासाठी त्यागून बनविले परित्यक्ता

बहिष्कृत केले कुष्ठरोगी, तृतीयपंथी म्हणून

बनविले आईबापांनाच दीनवाणे हाकलून घरातून

तर कधी नाकारली मानाने जगण्याची संधी केवळ आम्ही
अपंग म्हणून

कितीही कौतुक करा तुम्ही, तुमच्या प्रगतीचे, समृद्धीचे,
ऐश्वर्यसंपन्नतेचे

आम्ही मात्र कायम विद्रूप करत  राहू तुमचा उजळ माथा
बनून गोंदण तुमच्या अनास्थेचे
                                          
                                          - © सिद्धार्थ कुलकर्णी
                                                      
२३/९/१८

संबंध



संबंध  
                                  
                                                                     संबंध  


बसलो होतो वाळूत

समोर पसरला होता दर्या अथांग

माझ्या मनाचा थांग मज लागेना

आदळती लाटांमागून लाटा समोर

मनातही लाटा विचारांच्या उठती निरंतर

सरळ वेडेवाकडे चमत्कारिक असंबद्ध विचार

बस लाटांमागून लाटा विचारांमागून विचार

लाटांचा आणि विचारांचा परस्पर संबंध काय ?

समोर खेळत होते पाण्यात एक कुटुंब

आई पाण्याबाहेर पदर खोचून उभी

मुलं आणि वडिल पाण्यात दंगा करत, तिला बोलवत

अचानक आठवले माझे कुटुंब आईबाप भाऊ बहिण
या कुटुंबाचा माझ्या कुटुंबाशी संबंध काय?

समोर खडखडत गेला टांगा घेऊन एका प्रेमी युगूलाला

नकळत गुणगुणू लागलो अमिताभ परवीन चे एक गाणे
टांग्यातील अन् आठवली तीही

आता ते युगूल, अमिताभ परवीन आणि तिचा एकमेकांशी
संबंध काय?

पण असावा संबंध काहीतरी यांचा एकमेकांशी किंवा

असावेत काही अमूर्त विचार, अव्यक्त भावना, सुप्त इच्छा, पुसट धूसर स्मृती

मनाच्या तळाशी दडून ज्या अशा उद्दीपकांमुळे अनवधानाने, 

नकळत उसळी मारून बाहेर येतात चमचमणाऱ्या माश्यासारख्या
                                  
                                               - © सिद्धार्थ कुलकर्णी
                                                    २६/९/१८

Friday 21 September 2018

पाऊस

पाऊस
पाऊस

 
पाऊस येतो

अन् दरवेळेस सोबत तुझी आठवण घेऊन येतो

आपल्या नात्याला पावसाची सोबत नेहमीच होती, अगदी सुरूवातीपासून

आठवतेय ते रिमझिम पावसात झालेले तुझे पहिले दर्शन

चिंब ओली अशी तू उभी होती taxi ची वाट पाहत

आणि समोरच टपरीवर वाफाळता चहा घेत मी उभा होतो तुला पाहत

आवडली होतीस तू पाहताक्षणीच मला पण तू मला पाहिल तरी होतस का?

माहित नाही आणि मीही तुला नंतर कधी याबाबत छेडल नाही

नंतर तू पुन्हा दिसलीस गल्लीतल्या लहान पोराटोरांबरोबर

पावसाच्या साचलेल्या पाण्यात उड्या मारताना

मी मुद्दामहूनच तुमच्या जवळून गेलो आणि

माझ्या अपेक्षेप्रमाणे अंगावर पाणी उडाल म्हणून

तू माझी माफीही मागितलीस निरागसपणे

मी म्हणालो एवढ काय त्यात मीही खेळायचो कि लहानपणी असाच

तू म्हणाली मग आता काय झाल?

खेळाचा आनंद अनुभवायला वय आड येतय का?

मग मीही मारल्या उड्या तुझ्या सोबतीने

तुझ्या नजरेस नजर देऊन

तुझ बावरलेपण नाही लपवू शकली होतीस तू तेव्हा माझ्यापासून

मग सुरू झाला सिलसिला कॉफी, हॉटेलिंग, सिनेमा, आऊटींगचा

आणि कधी आपण जवळ आलो कळलेच नाही

लग्नही आपण केल ते पावसाळ्यातच

लग्नकार्यालयाबाहेर भुरूभुरू पाऊस तर आत आपल्या अंगावर फुलाअक्षतांची भुरभुर

तू म्हणालीस हनीमूनला कुठे जायची गरजच नाही

पाऊस असताना आपल गावही हनिमून प्लेसच आहे

मग पुरेपुर भिजलो आपण पावसाच्या आणि प्रेमाच्या सरींत

सगळ छान चालू होत आणि तो दिवस आला

सभोवती कोसळणारा भयाण मुसळधार पाऊस

आणि डॉक्टरांकडून तुझ्या आजाराच निदान ऐकून

त्या पावसात घराकडे  चालत येणारा

आतल्या आत कोसळणारा मी

तू सगळ कळल्यावरही शांत राहिलीस फक्त एवढच विचारलस किती दिवस?

मी रडत राहिलो पण तू हट्टाला पेटलीस, परत परत तेच विचारत राहिलीस

मी कसनुसा होत म्हणालो बहुतेक एक वर्ष

मग सुरू झाली एक लढाई आधीच हारलेली

तुझी अवस्था दिवसेंदिवस बिघडत चाललेली

त्या वर्षी लवकरच पाऊस सुरू झाला, पहिलाच पाऊस

रस्ते, इमारती, माणसे भिजवून टाकणारा

सर्व धुऊन स्वच्छ करून टाकणारा

आसमंतात मातीचा मस्त सुगंध दरवळत होता

अचानक माझा हात घट्ट धरून तू हमसून हमसून रडू लागलीस

आजारपणात तू अशी पहिल्यांदाच रडलीस

मी ही रडू लागलो मग तू रडायची थांबलीस

तुला दम लागला, तुझी छाती उडू लागली

थरथरत्या ओठांनी कुजबुजल्यासारखी तू म्हणालीस

राजा, काळजी घे स्वतःची, मी आता निघतेय

पण तुझ्यासाठी पावसाला मागे ठेवून जातेय

बस एवढच, खेळ खलास, संपलच सगळ

त्यानंतर तुझी माझी पुन्हा भेट नाही, भेट होणे शक्यही नाही

तो मात्र दरवर्षी तू सांगितल्याप्रमाणे येतो

व तुझ्या आठवणींची बरसात करून जातो

                          - © सिद्धार्थ कुलकर्णी                       
                                    २१/९/१८

Thursday 20 September 2018

प्रेमाचा हिशोब

प्रेमाचा हिशोब तू ठेव

मी फक्त प्रेम करणार आहे

आपण कितीदा भेटलो, कुठे

भेटलो, कधी भेटलो

याची तुझ्या डायरीत नीट नोंद

करून ठेव

मी फक्त दरवेळी तुला कडकडून

भेटणार आहे

आपण कितीदा भांडलो, रूसलो,

फुगलो परत एकत्र आलो

याची उजळणी तू माझ्यासमोर

शंभरदा कर

मी फक्त प्रेमाच्या प्रोसेसची गंमत

अनुभवणार आहे

हजारदा फोन करून काय

जेवलास, कधी उठलास, काय

करतोय आत्ता अशा निरर्थक

गप्पा तू खुशाल कर

मी फक्त तुझा गोड आवाज ऐकत

राहणार आहे

आपल्याला भेटताना कोणी

ओळखीच बघेल का, घरी कोणी

आपल्याबद्दल सांगेल का

याची काळजी तू जरूर कर पण

तशीच वेळ आल्यास मी

बिनधास्त आपल्या प्रेमाची

कबूली देणार आहे

मी आज कशी दिसते, मी काल

कशी दिसत होती, माझ वजन

वाढलय का अशा प्रश्नांनी माझ

डोक तू जाम पिकव

मी मात्र तुझ नखशिखान्त सौंदर्य

न्याहाळणार आहे

प्रेमाचा हिशोब तू ठेव

मी फक्त प्रेम करणार आहे

                      - © सिद्धार्थ कुलकर्णी
                           २०/९/१८

स्पार्टाकसचे बंड



हृद्यात आमच्या पेटला अंगार आहे

आज काही वेगळाच आमचा अवतार आहे

चाबकाने केले आम्हांवर वार युगानयुगे ज्यांनी

त्यांच्यावर आज आमचा पलटवार होणार आहे

जनावरासारखे बाजारात विकले आम्हाला ज्यांनी

त्यांचा हिशोब आज चुकता होणार आहे

ग्लॉडिअॉटर बनून आप आपसात झुंजलो आम्ही

आज आमच्या एकजुटीने तुमचा खात्मा होणार आहे

ज्यांच्या बळावर उभारले साम्राज्य तुम्ही

त्यांच्या हातूनच ते आज धुळीस मिळणार आहे

स्पार्टाकसने चेतवले जे स्फुल्लिंग आमच्यात

त्याच्या वन्हीत तुमची राख आज होणार आहे

गुलामीच्या शृंखला तोडून आज

मानव कायमचा मुक्त होणार आहे

                           © सिद्धार्थ कुलकर्णी
                                  २०/९/१८

Monday 17 September 2018

पंखा भिरभिरता

एकदा पडलो होतो उताणा बघत पंखा भिरभिरता

जणू परमेश्वर नियंत्रित करणारा कालचक्राला असा

मग थांबवले गंमत म्हणून मी कालचक्र स्विच आॉफ करून

नंतर केले सुरू स्वतःच्या जादुई ताकदीवर ते पुन्हा

बंद सुरू,बंद सुरू,सुरू बंद,सुरू बंद.......

नंतर आला एक शंकेखोर भुंगा तो पोखरू लागला माझे मेंदूफूल शोषण्यास ज्ञानरस

शोधू लागलो मी जादुई शक्तीचे मूळ आणि मला पाहत होती

सॉकेटची तीन कृष्णविवरे जणू त्रिदेव कि त्रिनेत्र शिवाचे

वायरीतून येते ती जादुई शक्ती की ट्रान्सफॉरमर मधून कि

पॉवरस्टेशनमधून कि विद्युतजनित्रातून कि.....

एकामागोमाग एक प्रश्न असा शिरलो मी प्रश्नांच्या निबिड अरण्यात खोलवर अन्

निरूत्तरतेच्या रखरखीत वाळवंटात वाट चुकून स्वतःच्या

अक्षमतेच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रखर प्रकाशाने भोवंडून

परत झोपलो गपगार अज्ञानाच्या कुशीत शिरून सुरू करून पुन्हा पंखा भिरभिरता

                                      - © सिद्धार्थ कुलकर्णी
                                                ११/९/१८