Blogadda Who are you reading today?

https://www.blogadda.com" title="Visitblogadda.com to discover Indian blogs" > https://www.blogadda.com/images/blogadda.png" width="80" height="15" border="0" alt="Visit blogadda.com to discover Indian blogs"/>

Friday 21 September 2018

पाऊस

पाऊस
पाऊस

 
पाऊस येतो

अन् दरवेळेस सोबत तुझी आठवण घेऊन येतो

आपल्या नात्याला पावसाची सोबत नेहमीच होती, अगदी सुरूवातीपासून

आठवतेय ते रिमझिम पावसात झालेले तुझे पहिले दर्शन

चिंब ओली अशी तू उभी होती taxi ची वाट पाहत

आणि समोरच टपरीवर वाफाळता चहा घेत मी उभा होतो तुला पाहत

आवडली होतीस तू पाहताक्षणीच मला पण तू मला पाहिल तरी होतस का?

माहित नाही आणि मीही तुला नंतर कधी याबाबत छेडल नाही

नंतर तू पुन्हा दिसलीस गल्लीतल्या लहान पोराटोरांबरोबर

पावसाच्या साचलेल्या पाण्यात उड्या मारताना

मी मुद्दामहूनच तुमच्या जवळून गेलो आणि

माझ्या अपेक्षेप्रमाणे अंगावर पाणी उडाल म्हणून

तू माझी माफीही मागितलीस निरागसपणे

मी म्हणालो एवढ काय त्यात मीही खेळायचो कि लहानपणी असाच

तू म्हणाली मग आता काय झाल?

खेळाचा आनंद अनुभवायला वय आड येतय का?

मग मीही मारल्या उड्या तुझ्या सोबतीने

तुझ्या नजरेस नजर देऊन

तुझ बावरलेपण नाही लपवू शकली होतीस तू तेव्हा माझ्यापासून

मग सुरू झाला सिलसिला कॉफी, हॉटेलिंग, सिनेमा, आऊटींगचा

आणि कधी आपण जवळ आलो कळलेच नाही

लग्नही आपण केल ते पावसाळ्यातच

लग्नकार्यालयाबाहेर भुरूभुरू पाऊस तर आत आपल्या अंगावर फुलाअक्षतांची भुरभुर

तू म्हणालीस हनीमूनला कुठे जायची गरजच नाही

पाऊस असताना आपल गावही हनिमून प्लेसच आहे

मग पुरेपुर भिजलो आपण पावसाच्या आणि प्रेमाच्या सरींत

सगळ छान चालू होत आणि तो दिवस आला

सभोवती कोसळणारा भयाण मुसळधार पाऊस

आणि डॉक्टरांकडून तुझ्या आजाराच निदान ऐकून

त्या पावसात घराकडे  चालत येणारा

आतल्या आत कोसळणारा मी

तू सगळ कळल्यावरही शांत राहिलीस फक्त एवढच विचारलस किती दिवस?

मी रडत राहिलो पण तू हट्टाला पेटलीस, परत परत तेच विचारत राहिलीस

मी कसनुसा होत म्हणालो बहुतेक एक वर्ष

मग सुरू झाली एक लढाई आधीच हारलेली

तुझी अवस्था दिवसेंदिवस बिघडत चाललेली

त्या वर्षी लवकरच पाऊस सुरू झाला, पहिलाच पाऊस

रस्ते, इमारती, माणसे भिजवून टाकणारा

सर्व धुऊन स्वच्छ करून टाकणारा

आसमंतात मातीचा मस्त सुगंध दरवळत होता

अचानक माझा हात घट्ट धरून तू हमसून हमसून रडू लागलीस

आजारपणात तू अशी पहिल्यांदाच रडलीस

मी ही रडू लागलो मग तू रडायची थांबलीस

तुला दम लागला, तुझी छाती उडू लागली

थरथरत्या ओठांनी कुजबुजल्यासारखी तू म्हणालीस

राजा, काळजी घे स्वतःची, मी आता निघतेय

पण तुझ्यासाठी पावसाला मागे ठेवून जातेय

बस एवढच, खेळ खलास, संपलच सगळ

त्यानंतर तुझी माझी पुन्हा भेट नाही, भेट होणे शक्यही नाही

तो मात्र दरवर्षी तू सांगितल्याप्रमाणे येतो

व तुझ्या आठवणींची बरसात करून जातो

                          - © सिद्धार्थ कुलकर्णी                       
                                    २१/९/१८

No comments:

Post a Comment