अनास्थेचे गोंदण
तुम्ही जा खुशाल शौचास पांढऱ्याशुभ्र संगमरवरासारख्या
टाईल्सच्या संडासात
आम्ही हगू निवांत रेल्वेरूळांजवळ पाहत तुमची
लोकलमधली गच्च खदखद
तुम्ही दररोज व्हा सुस्नात गीझरच्या गरम पाण्याने आंघोळ करून
आम्ही महिनोमहिन्यांचे पारोसे खाजऱ्या अंगाने तुम्हाला
हात लावण्याची भीती घालून करू वसूली तुमच्याकडून
तुम्ही प्या Eno आधी पोट फुटेस्तोवर जेवून
आणि आम्ही पिऊ पाणी भूकेस हुसकावण्यासाठी पोटातून
तुमच्या गगनचुंबी टॉवरच्या कडेला फुटपाथवर टाकू आम्ही
आमच्या पथाऱ्या
तुमच्या रेल्वेस्टेशन, बसस्टँड बाहेर वाजवू आम्ही आमच्या
गरीबीच्या तुताऱ्या
तुमच्या मंदिरांबाहेर रांगेत बसू आम्ही दारिद्र्याचा शेंदूर
फासलेल्या मूर्तीसारखे घेण्यास भिकेची खिरापत
तर कधी करू तुमची करूण आर्जवे गाऊन फिल्मी
गाणी गेंगाण्या आवाजात
कधी करू प्रदर्शन स्वतःच्या अपंगत्वाचे, रोगाचे तुमच्यासमोर ओंगळवाणे
तर कधी टाळ्या कुटत भसाड्या आवाजात तुमच्याशी बोलून
करू तुम्हाला ओशाळवाणे
पण तुम्ही कितीही टाळले, दुर्लक्ष केले, अनुल्लेखाने मारले
तरी आम्ही बनून राहू भळभळती जखम तुमच्या व्यवस्थेची
ज्या व्यवस्थेने उद्ध्वस्त केले आम्हाला प्रकल्पग्रस्त
करून,
लज्जेपोटी, दारिद्र्यापोटी अनाथ करून दिले उकिरड्यावरती फेकून
स्वार्थासाठी त्यागून बनविले परित्यक्ता
बहिष्कृत केले कुष्ठरोगी, तृतीयपंथी म्हणून
बनविले आईबापांनाच दीनवाणे हाकलून घरातून
तर कधी नाकारली मानाने जगण्याची संधी केवळ आम्ही
अपंग म्हणून
कितीही कौतुक करा तुम्ही, तुमच्या प्रगतीचे, समृद्धीचे,
ऐश्वर्यसंपन्नतेचे
आम्ही मात्र कायम विद्रूप करत राहू तुमचा उजळ माथा
बनून गोंदण तुमच्या अनास्थेचे
- © सिद्धार्थ कुलकर्णी
२३/९/१८
No comments:
Post a Comment