संबंध
बसलो होतो वाळूत
समोर पसरला होता दर्या अथांग
माझ्या मनाचा थांग मज लागेना
आदळती लाटांमागून लाटा समोर
मनातही लाटा विचारांच्या उठती निरंतर
सरळ वेडेवाकडे चमत्कारिक असंबद्ध विचार
बस लाटांमागून लाटा विचारांमागून विचार
लाटांचा आणि विचारांचा परस्पर संबंध काय ?
समोर खेळत होते पाण्यात एक कुटुंब
आई पाण्याबाहेर पदर खोचून उभी
मुलं आणि वडिल पाण्यात दंगा करत, तिला बोलवत
अचानक आठवले माझे कुटुंब आईबाप भाऊ बहिण
या कुटुंबाचा माझ्या कुटुंबाशी संबंध काय?
समोर खडखडत गेला टांगा घेऊन एका प्रेमी युगूलाला
नकळत गुणगुणू लागलो अमिताभ परवीन चे एक गाणे
टांग्यातील अन् आठवली तीही
आता ते युगूल, अमिताभ परवीन आणि तिचा एकमेकांशी
संबंध काय?
पण असावा संबंध काहीतरी यांचा एकमेकांशी किंवा
असावेत काही अमूर्त विचार, अव्यक्त भावना, सुप्त इच्छा, पुसट धूसर स्मृती
मनाच्या तळाशी दडून ज्या अशा उद्दीपकांमुळे अनवधानाने,
नकळत उसळी मारून बाहेर येतात चमचमणाऱ्या माश्यासारख्या
- © सिद्धार्थ कुलकर्णी
२६/९/१८
No comments:
Post a Comment