टीप- या कवितेत वृक्ष व समुद्रपक्षी यांचे रूपक वापरून
व्यक्तीच्या आयुष्याच्या सुरूवातीपासून आयुष्याच्या
संध्याकाळपर्यंतचा जीवनपट उलगडलेला आहे.तसेच
आयुष्याच्या संध्याकाळी येणारा एकाकीपणा व
आपल्यासारख्या समदुःखी व्यक्तीशी बोलून आपल्या
भावना व्यक्त करण्याची आस व त्यातून पडणारा
आपल्या वेदनांचा विसर या कवितेत वर्णन केलेला
आहे.
सखा समदुःखी
वृक्ष-
अजून स्मरणात आहे ती उबदार,ओलसर
मृत्तिकापाशातील घुसमट आणि नंतर ते तरारून येणे,
सर्वांगाचे पाचू बनणे।।१।।
अजून स्मरणात आहे ते बाहू विस्फारत भरतीसारखे पुढे
पुढे जाणे गगनमिठी मारण्यासाठी।।२।।
अजून स्मरणात आहे ते हरित पताका फडकवत बेलाग
कड्यासारखे खडे राहणे वादळवाऱ्यात आणि खदखद
हसणे अस्मानीसुलतानी पावसात।।२।।
अजून स्मरणात आहे ते आधारवड होणे,आल्हादछाया
देणे,कनवाळूपणे अंगाखांद्यावर वागवणे ओझे निरंतर
आनंदाने।।३।।
अजून स्मरणात आहे ते धीमेधीमे एकेकाचे माना टाकणे
मग अखंड झडणे हिरव्या जिभांचे अन् अलगद पसरणे
तनामनावर गडद तपकिरी मरूरंगाचे।४।।
समुद्रपक्षी-
मागे सरले ते इवले इवले चोचदाणे, गिरक्या घेणे अन्
कोलांट उड्या मारणे आभाळात।।५।।
मागे सरले ते मौक्तिकमाळ बनवून भरारणे निरनिराळे
प्रदेश धुंडाळत अन् ते तरंगणे पाहत अथांग शाईदर्याच्या
आइन्यातील चमचम।।६।।
मागे सरले ते चिमुकल्या पंखांना बळ देणे आणि गोष्टी
शिकविणे जगरहाटीच्या चार।।७।।
मागे सरली ती हृद्यातील ठसठसही एकेक मोती गळून
पडल्यानंतरची ।।८।।
आता फक्त उरलय शिड फाटलेल्या गलबतासारखे वारा
नेईल तिथे एकांडे झोकांड्या खात जाणे।।९।।
असो.आलोच आहोत या प्रदेशात बऱ्याच काळाने तर
विसावूया अंमळ क्षणभर पुरातन आधारवडाच्या
शीतकुपीत।।१०।।
अरेरे,हे काय हा तर शुष्क,निष्पर्ण वठलेला ओसाडवड
विद्रुपित।।११।।
जाऊ दे भेटूया आपल्या या जुन्या दोस्ताला आणि
काळडोहात डुंबून होऊ स्मृतीचिंब अन् उल्हसित ।।१२।।
वृक्ष-
हा,कोण येतोय भेलकांडत आशेने मजकडे?यांस
माहित नाही का आताशा गिधाडांशिवाय कोणी येत
नाही इकडे,
अहाहा,काय हे अघटित हा तर जुना पांथस्थ, माझा
सखा समदुःखी,पिसं झडलेला समुद्रपक्षी,सुखावते मन
माझे ऐकेल कोणी आज मज अंतरीचे गीत अन् पळभर
विस्मृतीत जाईल अटळ मृत्यूचे विधिलिखित।।१३।।
- © सिध्दार्थ कुलकर्णी
७/८/१८