हो, मला ठाऊक होते तुझ्या गाभाऱ्यात त्याचा घंटानाद
हा नेहमीच होता,अत्तर सुगंध, सोनेरी प्रकाश नेहमीच
होता,शांत,तृप्त आत्मानंद नेहमीच होता,पण मी
अविरत साद देत राहिलो आणि वाट पाहत राहीलो
तुझ्या गाभाऱ्याबाहेर वेटोळे घालून।।१।।
कारण मला ठाऊक होते तू डोकावशील कधीतरी
गाभाऱ्यापल्याड,माझ्या माणिकडोळ्यांशी नजरानजर
करायला आणि मग नजरबंदी करणारे माझे सर्पगारूड
नादावेल तुला,हळूहळू सगळ गढुळेल,प्रकाशखडा
विरघळेल आणि शीतस्पर्श जाणवेल माझा,चंदनापेक्षा
थंड कोरडा।।२।।
अन् मग भास आभासाचे मृगजळ खुणावेल, कृष्णवाटा
मोहवतील,सुरू होईल एक अनंत घसरण तळ
नसलेल्या पाताळदरीत,कारण मला ठाऊक होते तुझ्या
गाभाऱ्याच्या अडगळीत फुत्कारनाद नेहमी माझाच
होता,माझाच होता।।३।।
- ©सिध्दार्थ कुलकर्णी
६/८/१८
No comments:
Post a Comment