अजूनी भूल पाडते मजला ती
चांदणबुट्टीने मढलेल्या आभाळशालूची
झगमगती रात।।१।।
अजूनी भूल पाडते मजला ती
तरूवेलींना लगडलेल्या लुकलुकत्या काजव्यांच्या
आकाशकंदिलांची रात।।२।।
अजूनी भूल पाडते मजला ती
माना वेळावून पाहणाऱ्या कुतूहलभरल्या
हिरव्या मृगनयनी
जथ्थ्यांची रात।।३।।
अजूनी भूल पाडते मजला ती
सळसळणाऱ्या पानाफुलातून घुमणाऱ्या
रानधुनेची कातर रात।।४।।
अजूनी भूल पाडते मजला ती
चंदेरी सृष्टीप्रभेने उजळून निघालेली
खानदानी शालीन रात।।५।।
अजूनी भूल पाडते मजला ती
तळ्यात दिसणाऱ्या हलत्या प्रतिबिंबांच्या
जादूगरीची रात।।६।।
अजूनी भूल पाडते मजला ती
धीरगंभीर पिरॅमिडी करड्या डोंगरांनी
भारलेली गुढभरी रात।।७।।
अजूनी भूल पाडते मजला ती
चांदमायेने ओथंबलेली सदा रोशन
अशी पुनवेची रात।।८।।
- © सिध्दार्थ कुलकर्णी
३०/८/१८
No comments:
Post a Comment