तस पाहिल तर माझी ही खूनमालिका चालू आहे
डेली सोपसारखी अनेक वर्षं दररोज
कालच मी केला इमानदारीचा खून
देऊन रूपये पन्नास टि.सी.ला पावती फाडण्यापासून
रोखण्यासाठी
परवा केला होता मी खून मुलाच्या आनंदाचा
त्याच्याकडून मोबाईल हिसकावून शिस्त लावण्यासाठी
तेरवा मी केला बायकोच्या उत्साहाचा खून
तिचा शॉपिंगचा प्लान मोडून काटकसरीसाठी
त्याच्या आदल्या दिवशी केला मी खून भिकाऱ्याच्या
आशेचा
त्याला पैसे देणे नाकारून उद्दामपणे
त्याच्या आदल्या दिवशी केला होता मी खून बॉसच्या
विश्वासाचा
आजारी असल्याचे कारण सांगून सुट्टी घेताना
नात्यातील लग्न अटेंड करण्यासाठी
असे करत असतो मी खून जवळपास रोजच
आणि पछाडतो तात्पुरता अपराधीभावाने अन्
विसरून जातो केलेले खून कालांतराने
पण दर श्वासागणिक आठवत राहतो तो केलेला खून
स्वतःच्या स्वप्नांचा अनवट वाट टाळून वहिवाट
स्विकारण्यासाठी
बाकी तस पाहिल तर माझी ही खूनमालिका चालू आहे
डेली सोपसारखी अनेक वर्षं दररोज
- © सिद्धार्थ कुलकर्णी
No comments:
Post a Comment