पांढर धोतर,पांढरा सदरा,
डोईवरचे केसही पांढरे,
अन् पांढरी दाढी
असा धुरकट पांढरा म्हातारा।।१।।
दिसायचा कधी पारावर,
कधी मंदिरासमोर,
कधी रेल्वे स्थानकात
गुडघ्यात डोकं टाकून बसलेला
असा धुरकट पांढरा म्हातारा।।२।।
कधी हातवारे करत स्वतःशीच बडबडणारा
तर कधी रणरणत्या उन्हात पोळलेल्या पाऊलांनी
लटलटत चालणारा
असा धुरकट पांढरा म्हातारा।।३।।
कधी अधाशी डोळ्यांनी तासनतास
उकिरडा उपसणारा
तर कधी उदासवाणा स्वतःतच मिटणारा
असा धुरकट पांढरा म्हातारा।।४।।
एकदा दिसला मैदानात
वर्तमान पत्राच्या कागदात
गुंडाळलेल काही खात,
बघत एकटक खेळ मुलांचा
स्वतःशीच कधी हसत,
कधी डोळे पुसत
असा धुरकट पांढरा म्हातारा।।५।।
अन् दिसला अचानक एकदा बेवारशी
कुत्र्यासारखा
गटाराजवळ पडलेला, सडलेला,
फुगलेला,
माश्यांनी वेढलेला,निश्चल
असा धुरकट पांढरा म्हातारा।।६।।
उदबत्ती विझली, धुर साकळला,
झाला ढग पांढरा
आभाळात एकाकी भरकटणारा
आता धुरकट पांढरा म्हातारा।।७।।
-© सिद्धार्थ कुलकर्णी
२९/८/१८
No comments:
Post a Comment