भीती थंड सर्पासारखी त्याला वेटोळे घालू लागली. त्याची इच्छा नसतानाही संमोहित झाल्यासारखा तो बेडवरून उठला व राखाडी चंदेरी गुढ प्रकाशात कपाटाकडे गेला. तो कपाटाजवळ पोचताच तो आवाज थांबला.आपल्याला मघापासून भास होतायत हे आठवून तो जरा सावरला. त्याने एका दमात कपाटाचा दरवाजा उघडला आणि कपाटात बसलेल्या तिला पाहून त्याचे पाय जणू जमीनीतच रूतले. हिरवं लुगड नेसलेली ती गुडघ्यात मान टाकून उकिडवी बसली होती. केसांमुळे तिचा चेहरा झाकला गेला होता. काळ जणू स्तब्ध झाला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. भोवळ आल्यासारख वाटत होत. गरगरत होत. तेवढ्यात तिने मानेला एक हिसडा दिला व खदखद हसत त्याच्याकडे पाहू लागली. पांढरी बुबुळं, मळवट भरलेलं कपाळ आणि ते भेसूर हसण. त्याच्या हातापायांतल त्राणच गेल. तरी लुळ्या पायांनी कसबस खुरडत तो बेडरूमबाहेर पडला. मागे तिच्या खदखद हसण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता. बाहेरही चंदेरी करड्या प्रकाशाने आता हातपाय पसरले होते. सर्वत्र मंतरल्यासारख धुरकट वातावरण होत. समोर स्टुल दिसताच तो त्यावर चढून माळ्यावर गेला.आता तो माळा त्याला सुरक्षित वाटत होता. थोड्या वेळाने तिचा आवाज शांत झाला. तो थरथथरत माळ्यावरच बसून राहिला. आपणही आईबाबांबरोबर गावी गेलो असतो तर बरं झाल असत अस त्याला वाटू लागल. मग परत तीच कुजबुज त्याच्या कानी पडली व त्याबरोबर धूसर रूपेरी अस्पष्ट प्रकाशात लुकलुकते डोळेही दिसले. पण त्या कुजबुजीला आता शब्द प्राप्त झाले होते. "आमचा बळी का दिलास? का दिलास आमचा बळी?" असे शब्द त्याच्या कानावर पडू लागले. तो आवाज उत्तरोत्तर वाढत गेला. त्याने असह्य होऊन कानात बोटं टाकली व डोळेही मिटून घेतले. नंतर काही काळ असाच गेला. त्याने हिंमत करून हळूच डोळे उघडले आणि त्याचा जीव त्याच्या घशात अडकला. समोरच लुकलुकत्या डोळ्यांची, विद्रूप, रक्ताळलेल्या चेहऱ्याची दोन लहान मुलं मांडी घालून त्याच्याचकडे एकटक पाहत बसली होती. त्यांनी रक्ताने माखलेली बनियन व खाकी हाफ पँट घातली होती. त्यांच्या सर्वांगावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. अचानक त्यांनी त्यांच्या माना ३६० अंशात गरगर वळवायला सुरूवात केली. ते पाहून भितीने त्याचा बर्फ झाला.मग बर्फ वितळून त्याचं पाणी व्हावं व आपली वाट शोधत जाव तस धडधडत्या हृद्याने तो सरपटत सरपटत माळ्याच्या कडेला आला व स्टुलवरून खाली उतरला. त्याने बेडरूमच्या दरवाजाकडे पाहिल तर तिथे ती उभी होती. ती खदखद हसत त्याच्याच दिशेने धावली. तो जिवाच्या आकांताने धावत हॉलकडे गेला. हॉलमध्ये ट्युबलाईटचा लख्ख प्रकाश दिसत होता व टि.व्ही.चा आवाजही ऐकू येत होता. आत शिरताच त्याने पाहिले सोफ्यावर, डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर बरेच लोक बसले होते. त्यांना मुंडकी नव्हती. केवळ धडं. मुंडकी टीपॉयवर व डायनिंग टेबलवर होती. ती मुंडकी त्याच्याकडे विस्मयाने पाहत होती. त्याला किंचाळावस वाटत होत. पण तोंडातून शब्द फुटत नव्हते.त्याच्या छातीत ठसठसत होत. हृद्यात असंख्य सुया टोचल्यासारखं वाटत होत. तेवढ्यात बेल वाजली. कोणीतरी आपल्यासारख मानवी अस्तित्व दरवाज्याबाहेर असाव व ते आपल्याला ह्या अमानवी शक्तींपासून वाचवेल, कदाचित आईबाबा आले असतील अशा आशेने तो भेलकांडत दरवाज्याकडे झेपावला. दरवाजा उघडला तर समोर मघाचचा वेडा उभा होता. त्याला त्या वेड्याचा खूप आधार वाटू लागला.तेवढ्यात त्याच्या मागे ती उभी असलेली त्याला दिसली. अन् त्याच उरलसुरल अवसानही गळाल. वेडा दरवाज्याबाहेरच उभा राहून त्याच्याकडे पाहत बेल वाजवत राहिला. त्याने मागे पाहिले तर हातात आपलीच मुंडकी घेऊन धडं उभी होती, त्याच्या पायाशी तिच दोन लहान मुलं मांडी घालून मान गरगरा फिरवत बसली होती. समोर ती उभी होती. आता त्याच हृद्य भितीने पिळवटून निघाल, त्याच्या हातापायात गोळे आले. तिचा थंड, रूक्ष खरखरीत हात त्याच्या गळ्यावर होता. तिची नख त्यात रूतली होती. ती हळूहळू त्याचा गळा घोटत होती.तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ होता. तिची पांढरी बुबुळं जणू त्याच्या बुबुळांना स्पर्श करत होती. वेडा अखंड बेल वाजवत होता. त्याचा श्वास आता गुदमरत होता. तिच्यापासून सुटण्याचा एक शेवटचा निकराचा निष्फळ प्रयत्न त्याने केला. पण तिने आपली पकड अधिकच घट्ट केली. त्याचा श्वास कोंडला गेला. मग छातीत सुरा खुपसल्यासारखी एक अतीव वेदना. आणि नंतर सगळ शांत झाल.
बराच वेळ बेल वाजवूनही कोणीच दरवाजा उघडला नाही.म्हणून दरवाज्याजवळ दुधाची पिशवी ठेवून दुधवाला निघून गेला.आतून टि.व्ही.चा आवाज येत होता. तरी कोणी दरवाजा उघडत नाही याच आश्चर्य करत तो गेला. तेच पेपरवाल्यासोबत, कचरा गोळा करायला आलेल्या सोबत घडले.संध्याकाळ झाली. समोर राहणाऱ्या आजोबांनी बेल वाजवली. दिवसभर दरवाज्याबाहेर पेपर, दुधाची पिशवी पडली आहे आणि या पोराने अजून ती घरात घेतली नाही. आईबाबा गावी गेले तर थोड जबाबदारीने वागाव ना. आजकालची मुल ऐदी झाली आहेत. केवढा हा आळशीपणा असा विचार करत ते बेल वाजवत होते. पण दरवाजा काही उघडला नाही. आतून टि.व्ही.चा आवाज तर येतोय. मग त्यांनी जोरजोरात दरवाजा ठोठावला, त्याला हाक मारली. पण दरवाजा बंदच. त्याला आजोबांनी लँडलाईनवर, मोबाईलवर फोन लावून पाहिला. फोनच्या रिंगचा आवाज आतून येत होता मात्र फोन कोणीच उचलला नाही. त्यांनी मग वॉचमनला बोलवून आणले. त्याने प्रयत्न केला पण आतून काहीच प्रतिसाद नाही. आजोबांनी त्या मुलाच्या बाबांना फोन लावला तर ते म्हणाले कि ते सकाळपासून त्याला फोन लावत आहेत पण त्यांचा फोनही त्याने उचलला नाही. त्याच्या दोनतीन मित्रांना मग त्याच्या बाबांनी फोन लावले पण तो आज कोणालाच भेटलेला नाही असे कळले. नंतर त्याचे बाबा फोनवरून सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरींशी बोलले आणि चावीवाल्याला बोलवून आणायच ठरल. चावीवाला आला, नवीन चावीने latch उघडून आजोबा, वॉचमन, चावीवाला, सेक्रेटरी, चेअरमन आणि सोसायटीतली काही माणसं आत शिरली. हॉलचा लाईट, पंखा सुरू होता. टि.व्ही.ही चालू होता. ते बेडरुममध्ये गेले. तर बेडवर डोळे सताड उघडे ठेवून छताकडे पाहत तो पडला होता. त्याचा एक हात छातीवर होता. त्याचा श्वास सुरू नव्हता. हे पाहून सगळे हादरले. बिल्डींगशेजारच्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं. त्यांनी तो मृत झाल्याच घोषित केल. मग पोलिस, त्याच्या आईवडिलांना बोलावण, पोस्टमॉर्टम वगैरे. पोस्टमॉर्टममध्ये मृत्यूच कारण सांगण्यात आल, हृद्यक्रिया बंद पडून मृत्यू. एवढ्या तरूण मुलाला Heart attack कसा आला याच सर्वांनाच आश्चर्य वाटल. अस काय घडल असाव त्याच्याबाबतीत याबद्दल लोक तर्कवितर्क लढवत राहिले. त्याच्या मृत्यूमागे मात्र होती त्याला वाटणारी आत्यंतिक भीती. भय या भावनेची ताकदच अशी जबरदस्त आहे. ही भावना मुळात सजीवांमध्ये नैसर्गिक आपत्ती, शत्रू यांपासून स्वतःचे रक्षण करता यावे म्हणून उपजतच असते. ही भावना त्यांना सावध रहायला शिकवते. याच भावनेच्या आधाराने पुढे कल्पनेने मानवाने भूतप्रेत, पिशाच्च, सैतान, हडळ, डाकिण,काळी जादू यांची निर्मिती केली. त्यांच्या कथा रचल्या. त्यावर दूरचित्रवाणी मालिका, सिनेमे काढले. स्वतःला सुरक्षित वातावणात ठेऊन कथेतल्या, सिनेमा, मालिकेतल्या भीतीदायक गोष्टी अनुभवण्याची चटक मानवी मेंदूला लागली. परंतू काही माणसं कमकुवत मनाची असतात. ह्या भूतप्रेताच्या गोष्टी त्यांच्या मनावर खोल परिणाम करतात. त्यांच्या सुप्त मनामध्ये या गोष्टी अजगरासारख्या सुस्त पडून असतात. पूरक वातावरण मिळताच त्यांच्या नकळत हा अजगर त्यांना आपल्या वेटोळ्यांमध्ये गुरफटून घेतो व गुदमरवून टाकतो. त्याच्या बाबतीत हेच घडल. भित्रा स्वभाव, त्यात रात्रीचा एकटाच घरी, भूतप्रेताची मालिका पाहिलेली, लाईट गेलेली त्यामुळे अंधार. विविध भासआभासांमुळे त्याच्या मनावर आधीच ताण होता, त्यात भर पडली ती भयानक स्वप्नाची. मग काय भयाने, भितीने आपल काम चोख बजावल व त्याचा बळी घेतला. असे अनेक भीतीचे बळी, विविध फोबियांनी ग्रासलेली माणस आपल्या आजूबाजूला असतात, पूर्वीही होती, भविष्यातही राहतील. भयाचा हा खेळ बहुतेक मानवी अस्तित्त्वाच्या अंतापर्यंत असाच सुरू राहिल. भय इथले संपत नाही हेच खरे.
समाप्त
- © सिद्धार्थ कुलकर्णी
८/५/१९