Blogadda Who are you reading today?

https://www.blogadda.com" title="Visitblogadda.com to discover Indian blogs" > https://www.blogadda.com/images/blogadda.png" width="80" height="15" border="0" alt="Visit blogadda.com to discover Indian blogs"/>

Monday, 12 August 2019

भय ( भाग - २ ) कोणीतरी आहे तिथे

आणि अचानक त्याला जाणवल कि ते डोळे वेगाने त्याच्याचकडे झेपावत आहेत.हे जाणवताच तो थरथरत लगेच खाली उतरला.त्याच्याच हृद्याचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते.तो कंप पावणाऱ्या शरीराला सावरत बेडरूमकडे गेला व ताण असह्य होऊन बेडवर त्याने अंग टाकून दिले.थोड्यावेळाने त्याच्या हृद्याचे ठोके पूर्ववत झाले.तो बेडच्या मागच्या भिंतीला टेकून बसला.त्याने सभोवार पाहिले.बेडरूममध्ये बाहेरचा चंद्रप्रकाश पसरला होता.त्या चंदेरी करड्या प्रकाशाचा डंख होताच निर्जीव वस्तू झडझडून उठून बसल्या आहेत अस त्याला भासलं. जणू त्यांच्यात त्या जादुई प्रकाशाने जीव ओतला होता. नक्कीच काहीतरी मायावी होत त्या प्रकाशात. मोहवणार, भुलवणार, ओढ वाटावयास लावणार. त्या प्रकाशात वस्तूंचे नेहमीचे आकार गळून पडले होते. त्यांचा मुखवटा अचानक सरकला होता आणि आतमधल विद्रूप, भयकारी अस बाहेर पडल होत. भिंतीवरच्या फोटोफ्रेममध्ये बंदिस्त झालेले त्याचे आजोबा आज नेहमीप्रमाणे मायाळू वाटत नव्हते. जणूकाही त्यांच्या चेहऱ्याचा कोणी दुसराच उग्र माणूस त्या फ्रेममध्ये आज येऊन बसला होता. त्याने डावीकडे पाहिल आणि तो टरकलाच. खुंटीला लटकवलेले कपडे शिर नसलेल्या धडासारखे दिसत होते. जणूकाही ते अधांतरी तरंगत होते. त्याची नजर वर पंख्याकडे गेली. लाईट गेल्यामुळे स्तब्ध, निश्चल असलेल्या त्या पंख्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेरं होत. तरीच तो शिकाऱ्यासारखा योग्य वेळेची वाट पाहत टपून बसला होता. घड्याळाची टिकटिक ऐकून तो भानावर आला. त्याच्या मनात भयाबरोबर आता उत्सुकतेने चंचूप्रवेश केला होता. त्या उत्सुकतेनेच त्याला ढुशा मारून उठावयास भाग पाडले. तो त्या चंदेरी करड्या धुक्यात शिरला. स्वतःलाच चाटत बसलेल्या हिंस्त्र प्राण्याप्रमाणे निवांत पहुडलेल्या कपाटाचा दरवाजा त्याने उघडला. दरवाजा उघडताना झालेला आवाज करवतीने घासल्यासारखा त्याच काळीज चिरत गेला. कपाटाने तोंड आवासलं. तो आत डोकावला. कपाटाचा ड्रॉवर त्याने बाहेर खेचला, हाताने आतील आकार चाचपडत त्याने टॉर्च बाहेर काढला. टॉर्च अॉन केला. आजूबाजूला त्याचा प्रकाशझोत टाकला. नंतर अग्नीच्या साहाय्याने जगणाऱ्या आदिम मानवाप्रमाणे तो टॉर्चच्या पिवळ्या प्रकाशाच अस्त्र पेलत मनातल्या धाकधूकीला दडपण्याचा प्रयत्न करीत बेडरूमबाहेर पडला. नंतर माळ्याच्या भिंतीला टेकवलेल्या स्टुलवर चढून त्याने मन घट्ट करून हळूवारपणे माळयामध्ये प्रकाशाचा झोत चित्रकाराच्या ब्रशपणे फिरवला व एकजिनसी वाटणाऱ्या अंधारातून वेगवेगळे आकार प्रकट झाले. तेच ते त्याच्या ओळखीचे चिरपरिचित आकार. आणि त्याला परत ती कुजबूज ऐकू आली. ती माळ्याच्या उजव्या बाजूने येत होती. बरगड्यांना धडका देणाऱ्या हृद्याच्या ठोक्यांकडे महत्प्रयासाने दुर्लक्ष करत त्याने सर्रकन टॉर्चचा झोत आवाजाच्या दिशेने वळवला. तर तिथे एक उंदिर दिगःमूढावस्थेत बसलेला त्याला दिसला. त्याला एकदम हायस वाटल. फुग्यातून हवा जावी तसा त्याच्या मनावरील ताण क्षणार्धात उडून गेला. मग "बघा मायला, अजून भूतप्रेताच्या मालिका" अस स्वतःशीच बडबडत तो स्टुलावरून खाली उतरला व सरळ बेडवर जाऊन पसरला. बराच वेळ तो उकडत असल्यामुळे या कुशीवरून त्या कुशीवर अस करत होता. परंतू कालांतराने झोपेने त्याला गिळलेच. असेच कधीतरी रात्री थंड वारे त्याला चाटू लागले. सुखानंदात चूर होऊन तो निद्रेच्या बाहुपाशात अजूनच घट्टपणे विसावला. आणि त्या आवाजाने परत त्याच्या मनाच्या भिंतीवर भीतीची पाल चुकचूकली. आधी दूरून येतोय अस वाटणाऱ्या त्या मंद धडधड आवाजाने झपाट्याने वरची पट्टी गाठली आणि मुस्काट फोडून त्याला जागं केल.तो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता. कोणीतरी कपाटाच दार आतून जोरजोरात बडवत होत.
क्रमशः
-© सिद्धार्थ कुलकर्णी
      ८/५/१९


भय ( भाग - १ ) भयाचा खेळ

Flat च लॉक उघडून तो आत आला.चपला कोपऱ्यात भिरकावून लाईट, fan सुरू करून सोफ्यावर टेकला.थोडा वेळ रुमालाने घाम पुसत स्वस्थ बसला.नंतर उठून फ्रिजचे दार उघडून त्याने पाण्याची थंड बाटली तोंडाला लावली व घटाघटा पाणी प्याला.आता दोनतीन दिवस तो घरात एकटाच असणार होता. आईवडिलांना गावाला जाणाऱ्या गाडीत बसवूनच तो आला होता. त्याने रिमोटने टि.व्ही. अॉन केला. थोडावेळ त्याने म्युझिक channel वर गाणी पाहिली.मग स्पोर्टस् channel वर कुठलेतरी जुन्या भारत अॉस्ट्रेलिया match चे highlights.अचानक त्याच लक्ष घड्याळाकडे गेलं.१० वाजत आले होते. झी वाहिनीवरच्या 'आहट' या हॉरर सिरीयलची वेळ झाली होती. केबल टि.व्ही. येऊन भारतात ४-५ वर्षे झाली होती. आईवडिवलांच्या मागे लागून काही महिन्यांपूर्वी त्याने केबल सुरू करून घेतल होत. ही 'आहट' सिरीयल भूतप्रेत यांच्या कथा दाखवणारी होती. त्याला लहानपणापासूनच गुढकथा, भूतप्रेतांच्या कहाण्या यामध्ये प्रचंड रस होता.पण त्याच्या आईवडिलांचा त्याने या गोष्टी वाचू नये, पाहू नये असा प्रयत्न असायचा.कारण तो अशा गोष्टी वाचतो, पाहतो आणि त्यांच्या परिणामवश रात्रीअपरात्री भयानक स्वप्न पडल्यामुळे जोरजोरात किंचाळतो अस ते म्हणायचे. आताही 'आहट' पाहण्यापेक्षा डिस्कव्हरी, National Geographic सारखे माहिती देणारे, ज्ञानात भर घालणारे channel पहा अस त्यांच त्याला सांगण असायच.पण आज त्याला कोणी अडवू शकणार नव्हत.सिरीयल सुरू होण्यापूर्वी लगबगीने त्याने बेडरूममध्ये जाऊन कपडे बदलले व रात्री झोपायसाठीचे म्हणून सैलसर शर्ट व थ्री फोर्थ पँट घालून परत हॉलमध्ये आला.त्याने त्याची आवडती सिरियल पाहायला सुरूवात केली.आजची कथा भन्नाटच होती.त्यात असे दाखविले होते कि नायिकेला आरशात पडणारे तिचे प्रतिबिंब भारून टाकते व तिचा घास घेते.ती सिरीयल संपल्यानंतर त्याने दुसरे काही channel पाहिले.हळूहळू त्याचे डोळे जडावू लागले आणि चालू टि.व्ही. समोरच त्याचा कधी डोळा लागला हे त्याचे त्यालाच कळले नाही.टि.व्ही.तून कानावर काही असंबद्ध आवाज पडत होते.काही काळाने ते आवाज त्याच्या कानांना स्पर्श करेनासे झाले व निद्रेच्या काळ्या डोहात तो गडप झाला.असाच बराच काळ गेला.कानाशी डासांची गुणगुण, असह्य उकाडा यामुळे रात्री कधीतरी त्याला जाग आली.क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला कळले नाही.चोहो बाजूंनी काळोख दाटून आलेला त्याला जाणवला."हं..,लाईट गेलेले दिसतायत. fan ही बंद आहे त्यामुळे.तरीच उकडतय."त्याच्या मनातील विचारांच चक्र सुरू झाल.बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता.वैतागून त्याने समोर अंदाजाने हात फिरवला, हाताशी टीपॉयवर ठेवलेले वर्तमानपत्र लागले, त्याने तो स्वतःला वारा घालू लागला. हळूहळू डोळे अंधाराला सरावू लागले.आधी त्याला त्या दृश्याची तीव्रता जाणवली नाही.पण जेव्हा ती कळली तेव्हा त्याच्या काळजात चर्र झाले.खिडकीच्या काचेआडून आपल्याकडे कोणीतरी पाहतय अस त्याला जाणवल.काचेवर ती काळी आकृती पसरली होती.मधेमधे ती डोलायची.थोडा वेळ तो बसल्या जागी चुळबुळत राहिला.शेवटी मनाचा हिय्या करून तो उठला व परत भीतीने त्याच्या पायात बेड्या घालण्याआधी झपाट्याने खिडकी बंद करण्यासाठी खिडकीकडे गेला.जणू काही खिडकी बंद केली तर त्या आकृतीला आत शिरता येणार नाही अस कुठे तरी त्याच अंतर्मन सांगत होत.खिडकीजवळ गेल्यावर मात्र स्वतःचा मूर्खपणा कळल्यामुळे तो स्वतःशीच हसला.त्याच्या मनाभोवती आवळलेला भीतीचा पाश सुटला आणि त्याला हायसं वाटल.खिडकीसमोरच्या झाडाची सावली तिच्या काचेवर पडली होती.त्याने अर्धवट उघडी असलेली खिडकी आता सताड उघडली.गार वाऱ्याची एक झुळूक त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली.उल्हसित मनाने त्याने खाली पाहिले.तर खाली कोणीतरी त्याच्याचकडे पाहत उभ होत.त्याला वाटल आपल्याला भास होतोय पण नाही तो त्याच्याचकडे एकटक पाहत होता.तो शहारला आणि लगेच खिडकी बंद करून मागे वळला.भीती परत चोरपावलांनी त्याच्या मनात शिरली होती.त्यात आज पाहिलेल्या 'आहट' च्या एपिसोडचा हँगओव्हर.तो पुढे जायचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला कोणीतरी त्याचा शर्ट मागे खेचतय असा भास झाला.भास नव्हे खरोखरच त्याचा शर्ट कोणीतरी खेचत होत.त्याच्या मानेवरून एक घामाचा थंड ओघोळ शर्टाच्या आत झिरपत गेला.धीर एकवटून तो मागे फिरला आणि त्याचा जीव भांड्यात पडला.त्याचा शर्ट खिडकीच्या stopper मध्ये अडकला होता."सालं, काय चाललय आपल?" तो स्वतःशीच पुटपुटला.मग अचानक त्याला तो आठवला एकटक त्याच्याकडे पाहणारा. एका तिरमिरीत त्याने खाडकन खिडकी उघडली व खाली पाहिल.आता त्या व्यक्तीसमोर शेकोटी पेटलेली होती व तो त्या ज्वाळांकडे स्वस्थ पाहत बसला होता."अरे, हा तर आपल्या कॉलनीतला वेडा दिसतोय?यालासुद्धा आपण घाबरू लागलो.काही खर नाही आपल.अजून पाहा 'आहट'."मान हलवत तो समाधानाने सोफ्यावर येऊन बसला.असाच काही काळ गेला आणि त्याला कोणाच्यातरी कुजबुजण्याचा अस्पष्ट आवाज आला.मनाचा भ्रम असेल म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केल.पण तो आवाज परत येऊ लागला.माळ्यावरून तो आवाज येत होता.काही एक निश्चयाने उठून धडपडत तो स्वयंपाकघरात गेला.चाचपडत त्याने फडताळावरचं मेणबत्तीच पाकिट उचलल.एक मेणबत्ती काढली.तसाच अंधारात डोळे फाडून पाहत Gasच्या शेगडीकडे येऊन त्याने लायटरने शेगडी पेटवली.शेगडीच्या प्रकाशात त्याला एकदम बरं वाटल.त्या शेगडीच्या जाळावर त्याने मेणबत्ती प्रज्वलित केली.मग एका हातात मेणबत्ती व दुसऱ्या हातात हॉलच्या दरवाज्याच्या कडेला ठेवलेला स्टुल उचलून तो माळ्याच्या भिंतीखाली ठेवला.एका हातात मेणबत्ती धरून तोल सावरत तो स्टुलावर चढला व मेणबत्तीच्या प्रकाशात माळ्यात बघू लागला.मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात माळ्यावरील अडगळीचं सामान जणू सावजाची वाट बघत दबा धरून बसलेल्या हिंस्त्र प्राण्यासारखं वाटत होत.आता कुजबुजीचा आवाज वाढला होता.तेवढ्यात त्याच्या हाताला मेणाचा चटका बसला आणि मेणबत्ती त्याच्या हातून निसटली. एकदम काळोखाने माळा गिळून टाकला. जमिनीवर मेणबत्तीचा प्रकाश शेवटचे आचके देत होता.तो भारल्यासारखा समोर पाहत होता.दोन लुकलुकणारे डोळे त्याच्याकडे अंधारातून पाहत होते.तेवढ्यात त्याच्या डावीकडे त्याच लक्ष गेल.तिथेही असेच दोन डोळे लुकलुकत होते.

क्रमशः

-© सिद्धार्थ कुलकर्णी
     ८/४/१९


आशा

पाठीत वाकलेला तो

तडा पडलेल्या काचेच्या चश्म्यातून

उन्हाने तडकलेल्या जमीनीकडे रोज पाहतो

मनी धरून दूर्दम्य आशा

की कधीतरी आभाळाच्या हृद्याला विजेने तडा जाईल

व ओघळतील त्यातून वर्षामौक्तिक गडगडाट करत धरित्रीवर सर्वदूर

- © सिद्धार्थ कुलकर्णी
           १/८/१९


प्रेमवीर ( अंतिम भाग - ४ )

सगळे माझ्याशी वागू लागले अंमळ जास्तच प्रेमाने

व अधूनमधून पुसू लागले मजला माझे गुपित

ते मात्र प्राणपणाने जपून ठेविले मी मनाच्या कुपीत।।२४।।

आला दिवस गेला दिवस

ऐसे चालले होते दिवस औदासिन्यात

अन् एके दिवशी खिडकीतूनी दिसले

नवीन बिर् हाड आलेले इमारतीमधी।।२५।।

पण  आपणांस नव्हते त्याचे कसलेही सोयरसूतक

कारण आपणांस तर होते प्रेममृत्यूचे सूतक।।२६।।

तेवढ्यात बेल वाजली दाराची

उघडले मी दार चडफडत

अन् उठली कळ हृद्यात

बघूनी दारात उभी लावण्यवती।।२७।।

ती म्हणाली कराल का तुम्ही मदत थोडी

मज वडिलांस वर चढवावयास अवजड सामान आमचे

आम्ही म्हणालो हे तर असे कर्तव्यच आमुचे।।२८।।

एकदम आला हुरूप  व शरीरात आले दहा हत्तींचे बळ

मग जुपूंनी घेतले आम्ही या समाजकार्यास हिरीरीने

व भाजल्या लष्करच्या भाकऱ्या खुशीने

आणि परत एकदा वाटू लागले फार छान,

जेव्हा उठल्या अंगातूनी  घामाबरोबरीने

आनंदलहरी उचलता ओझी प्रेमासाठी ।।२९।।

समाप्त

- © सिद्धार्थ कुलकर्णी
          ४/२/१९


प्रेमवीर ( भाग - ३) प्रेमाख्यान मागील पानावरून पूढे चालू

घेऊनी गुलाब हातात

शिरलो वर्गात

टेचात मोठ्या

पण ती नाही दिसली कोठेही।।१६।।

केले बहु सायास

पण नाही लावू शकलो कयास

तिच्या मनाचा।।१७।।

अन् घाव घातला तिने खोल

बोलूनी गोड बोल

बांधली राखी माझ्या हाताला।।१८।।

पुरती दैना झाली

यारदोस्तात अब्रू धुळीस मिळाली

सगळीकडे छीथू झाली

मज गरीबाची।।१९।।

मित्रांनीही संधी साधली

उपटूनी मजकडून पैसे

घेऊन आले दारूची बाटली

माझ्या दुःखास बुडविण्यास।।२०।।

मग मीही ढोसले मद्य ढसाढसा भरपूर

आणि गायली गाणी तिच्या प्रतारणेची।।२१।।

परंतू घरी पोहचताच  झिंगूनी

काढला कानाखाली जाळ बाबांनी

आणि फोडला हंबरडा आईने माझ्या काळजीने।।२२।।

कोंडून घेतले मग मी स्वतःस घरात

व बसू लागलो ऐकत किशोरची दर्दभरी गाणी

पाहूनी माझी ही अवस्था दीनवाणी

बापाच्याही डोळ्यात एकदा आले होते पाणी।।२३।।

क्रमशः

- © सिद्धार्थ कुलकर्णी
       २७/१/१९


प्रेमवीर ( भाग - २) प्रेमरोगाची बाधा व प्रेमात जिंकण्यासाठी केलेल्या खटपटी

काल टि.व्ही. पाहताना

गाण्यांमध्ये दिसू लागली ती

नेसून हिरोईनची साडी

वाटले झाली माझ्या डोक्यात बिघाडी

ठरवले गाठावे तडक आता दाक्तराला।।८।।

दाक्तरास विचारले

काय झाला मज रोग

तहानभूक हरपली

झोपही उडाली

काय मजवर ही विपदा आली।।९।।

दाक्तर हसला आणि म्हणाला

झाला तुज प्रेमरोग दुर्धर

औषधाने हा काबूत येणे दुष्कर

सोडावा लागेल तुज मदनबाण तिच्यावर सत्वर

हाच उपाय या रोगास एकमेव रामबाण।।१०।।

मग केल्या मी क्लृप्त्या फार

मित्राकडून लिहून घेऊन कविता

केले मी काव्यवाचन

आणि वक्तृत्वस्पर्धेत ठोकले भाषण

तिजवर प्रभाव पाडण्यासाठी।।११।।

पाठविली फेसबुकवर तिला फ्रेडशिंपची request

तिने केली ती accept

मग झाडल्या फैरी मी उत्साहात

पोस्टच्या।।१२।।

येता तिचे माझ्या पोस्टला like

माझ्या ब्लडप्रेशरमध्ये  होई hike

उचंबळून तिच्या प्रेमाने।।१३।।

अशात एकदा ती चक्क माझ्याकडे बघून हसली

मनी आले ही पोरगी आता प्रेमात फसली

त्याक्षणी आल्या मुंग्या सर्वांगास फार आणि

हृद्यास झाल्या गुदगुल्या चिकार

वाटले बहुतेक आले फळ आज मम तपाला।।१४।।

तनामनावर फिरू लागले प्रेमाचे मोरपीस

व्हँलेंटाईन डे पण आला मदतीस

ठरविले देऊ गुलाब तिला

त्यादिवशी।।१५।।

क्रमशः

- © सिद्धार्थ कुलकर्णी
         १५/१२/१८


प्रेमवीर ( भाग - १) हा प्रेमवीर प्रत्येकाला कॉलेज जीवनात भेटलाय

सिनेमा पाहून बाहेर आलो जोशात

दिसली ती उभी झोकात

दुकानासमोर।।१।।

गेलो होतो एकदा मंदिरात

होती ती उभी सुस्नात

जोडून हात

गाभाऱ्यात।।२।।

कोण कुठली ती पोरगी

पण केले होते

तिने घर हृद्यात

माझ्या।।३।।

कॉलेज सुरू जाहले

वर्ग वर्ग तारूण्य न्हाले

प्रेमकूजन सुरू झाले परत

सर्वदूर।।४।।

अन् शिरली ती वर्गात

गजरा माळूनी केसात

वाटले मजवरी साक्षात

प्रभूकृपा जाहली।।५।।

मग मीही घेतली नवीन कापडे

सेट केले केस वेडेवाकडे

सिनेमात हिरो फोडती लाकडे

मी उबविली वर्गातील बाकडे

प्रेमासाठी।।६।।

विषय एकाहूनी एक थोर

करीती प्राध्यापक आम्हांस बोअर

मात्र जिवाला लागला घोर

फक्त तिचाच।।७।।

क्रमशः

- © सिद्धार्थ कुलकर्णी
         १४/१२/१८